प्रपंच कोशाचा

मराठी लेखन-कोशाच्या पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना.

लेखक अरुण फडके, दिनांक January 01, 2001 · 26 mins read

प्रपंच कोशाचा

(मराठी लेखन-कोशाच्या पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना)

मी कोण?

मुद्रण तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतलेला आणि गेली सुमारे बावीस वर्षे मुद्रण व्यवसायात असलेला मी एक सामान्य माणूस. मुद्रणातील पदविका घेतल्यानंतर मी वडिलोपार्जित मुद्रण व्यवसायात सुमारे दहा वर्षे होतो. त्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानानुसार संगणकीय अक्षरजुळणीच्या व्यवसायात गेली बारा वर्षे आहे. ह्या दुसर्‍या व्यवसायात, मुख्यत: प्रकाशकांच्या पुस्तकांची संगणकीय अक्षरजुळणी करणे आणि पुस्तकातील चित्रे-आकृत्यांपासून मुखपृष्ठापर्यंत पुस्तकाचे सर्व काम करणे हा माझा मुख्य व्यवसाय.

शुद्धलेखन कोशाची गरज

मुद्रणालय चालवताना थोड्या प्रमाणात, आणि प्रकाशकांच्या पुस्तकांचे काम करताना अधिक प्रमाणात, मुद्रितशोधन करणे ही व्यवसायाची गरज राहिली. सुरुवातीच्या काळात चांगले मुद्रितशोधक न मिळाल्यामुळे बर्‍याच वेळा हे काम मला स्वत:लाच करावे लागत असे. भाषा आणि मुद्रितशोधन या दोन्हींची आवड असल्यामुळे मी ते करतही असे. भाषेची आवड असली तरी शालेय आयुष्यानंतर बराच काळ गेल्यामुळे अनेकांप्रमाणेच मलाही शुद्धलेखन आणि व्याकरण यांतील बर्‍याच गोष्टींचा विसर पडलेला होता. त्यामुळे मुद्रिते वाचताना९९- एखाद्या शब्दातील विशिष्ट वेलांटी किंवा उकार र्‍हस्व किंवा दीर्घ का? शब्दाचे सामान्यरूप होताना दीर्घ इकार किंवा उकार कधी र्‍हस्व होतो तर कधी दीर्घच राहतो असे का? असा शब्द समासात गेल्यावरही दीर्घ-र्‍हस्व असा बदल कधी होतो तर कधी होत नाही असे का? असे अनेक प्रश्न पडायचे. मात्र शंका आल्यावर, पुस्तक वाचून माहिती करून घेणे, या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींशी बोलून माहिती करून घेणे, असे मी करत होतो. शंकानिरसनासाठी शब्दार्थकोश पाहावा तर त्यात फक्त मूळ शब्द असतात. शब्दाचे सामान्यरूप; अनेकवचन; तृतीया, पंचमी, सप्तमी यांची रूपे; सर्वनामांची विभक्तिरूपे; क्रियापदांची काळ व अर्थांनुरूप होणारी विविध रूपे; या गोष्टी मराठी-मराठी शब्दार्थकोशांमध्ये सापडत नाहीत. इंग्लिश-इंग्लिश शब्दार्थकोशांमध्ये निदान अनियमित शब्दांच्या बाबतीत तरी त्यांची रूपे दाखवलेली असतात. मराठी-मराठी शब्दार्थकोशांमध्ये मात्र अशी पद्धत अजून सुरू झालेली नाही. याशिवाय, इंग्लिशमध्ये ‘स्पेलिंग डिक्शनरि’ म्हणून एक प्रकार असतो. एखाद्या शब्दाचा केवळ वर्णक्रम (स्पेलिंग) पाहायचा असेल तर शब्दार्थकोश पाहण्यापेक्षा अशी ‘स्पेलिंग डिक्शनरी’ पाहणे हे खूपच सुटसुटीत असते. मराठीत, शुद्धलेखनाच्या प्रचलित नियमांनुसार होणारी शब्दांची केवळ विविध रूपे दाखवणारा एकही कोश उपलब्ध नाही, असे मला आढळले.

‘शुद्धलेखन कोश’ करण्याचा पहिला प्रयत्न १९६१ साली पुण्याचे हरी सखाराम गोखले यांनी केला. ‘दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशन लि.’ यांनी हा कोश ‘शुद्ध-लेखन शुद्ध-मुद्रण शब्दकोश’ या नावाने प्रकाशित केला. या कोशातील शब्दांच्या रूपांची व्याप्ती अतिशय मर्यादित आहे आणि कोशाच्या मांडणीतही सुसूत्रतेचा अभाव आढळतो. याशिवाय, हा कोश १९६१ साली प्रकाशित झाल्यावर लगेच १९६२ साली ‘मराठी साहित्य महामंडळा’ने पुरस्कारलेल्या शुद्धलेखनविषयक नियमांना महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आणि हे नियम शिक्षणाच्या सर्वच स्तरांत अमलात आणले गेले. त्यामुळे प्रकाशित झाल्यापासून केवळ एकाच वर्षात हा कोश कालबाह्य ठरला. अर्थात, भाषेतील तज्ज्ञ मंडळींनी इतक्या वर्षांत जे केले नाही ते करण्याचा प्रयत्न मराठीच्या एका शिक्षकाने केला आणि मराठी माणसासमोर अशा कोशाची गरज मांडली ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद आहे.

या पहिल्या प्रयत्नानंतर २२ वर्षांनी, म्हणजे १९८३ साली, डॉ.द.ह.अग्निहोत्री यांनी त्यांच्या ‘अभिनव मराठी-मराठी शब्दकोश’ या शब्दार्थकोशात शब्दांचे उच्चार दाखवण्याच्या उल्लेखनीय प्रथेबरोबरच शब्दाचे सामान्यरूप आणि त्याचे अनेकवचन दाखवले आहे. पुण्याच्या ‘व्हीनस प्रकाशना’ने हे पाच खंड प्रकाशित केले आहेत. परंतु या शब्दार्थकोशात शब्दाचे सामान्यरूप आणि त्याचे अनेकवचन दाखवताना अग्निहोत्री यांनी शब्दाच्या फक्त शेवटच्या अक्षरात होणार्‍या बदलाची नोंद केली आहे. ‘कंदील, ऊस’ यांसारख्या शब्दांची सामान्यरूपे दाखवताना अग्निहोत्री यांनी ‘ला, सा’ असा फक्त शेवटच्या अक्षराचा बदल दाखवला आहे. किंवा ‘जीभ, फूल’ यांसारख्या शब्दांची अनेकवचने दाखवतानाही फक्त ‘भा, ले’ एवढाच बदल दाखवला आहे. शुद्धलेखनाच्या दृष्टिकोनातून शब्दाच्या उपा्नत्य अक्षराच्या इकारात किंवा उकारात होणारा बदल महत्त्वाचा असून तो दाखवायचा तर हे चार शब्द अनुक्रमे ‘दिला, उसा’ अशा सामान्यरूपांत, आणि ‘जिभा, फुले’ अशा अनेकवचनांत दाखवायला पाहिजेत. परंतु या कोशात अशी रूपे दाखवलेली नाहीत. त्याचप्रमाणे ‘पाऊस, माणूस’ यांसारख्या शब्दांची रूपे मराठीत ‘पावसा-, माणसा-’ अशी वैशिष्ट्यपूर्ण होतात याचीही नोंद या कोशात नाही. याशिवाय, ‘अग्नि, कवि, शक्ति, अणु, कटु, वायु’ यांसारखे तत्सम र्‍हस्वान्त शब्द मराठीत सुटे लिहिताना प्रचलित नियमानुसार ‘अग्नी, कवी, शक्ती, अणू, कटू, वायू’ असे दीर्घान्त लिहायचे आहेत याबाबतची कोणतीही सूचना या कोशातून मिळत नाही. तसेच व्युत्पन्न शब्द आणि अभ्यस्त शब्द यांच्या रूपांबाबतही हा कोश कोणतेही मार्गदर्शन करत नाही. अग्निहोत्रींच्या कोशातील दोष किंवा उणिवा दाखवणे हा माझा इथे हेतू नाही हे कृपया लक्षात घ्यावे. शब्दार्थांच्या दृष्टिकोनातून या कोशात बरेच चांगले गुण आहेत आणि माझा हा शुद्धलेखन कोश करतानाही मी या कोशाचा संदर्भ अनेक वेळा घेतला आहे याचा मी इथे कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतो. मला एवढेच म्हणायचे आहे की, शब्दांच्या रूपांच्या शुद्धलेखनाच्या दृष्टिकोनातून हा कोश फारसा उपयुक्त नाही, किंबहुना हे या कोशाचे मूळ उद्दिष्टच नाही.

या दोन कोशांव्यतिरिक्त शुद्धलेखनाचे संदर्भ पाहण्यासाठी उपलब्ध असलेले इतर साहित्य म्हणजे- पुण्याच्या ‘नितीन प्रकाशना’चे मो.रा.वाळंबे यांचे ‘मराठी शुद्धलेखन प्रदीप’, पुण्याच्याच ‘सोऽहम् प्रकाशना’चे द.न.गोखले यांचे ‘शुद्धलेखन विवेक’, मुंबईच्या ‘राज्य मराठी विकास संस्थे’च्या यास्मिन शेख यांचे ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’, आणि पुण्याच्या ‘स्नेहवर्धन प्रकाशना’च्या डॉ.स्नेहल तावरे यांचे ‘शुद्ध शब्द कोश’, ही चार पुस्तके आणि असल्यास यांसारखीच इतर काही पुस्तके. यांपैकी पहिल्या तीन पुस्तकांमध्ये मराठी शुद्धलेखनाच्या प्रचलित १८ नियमांचा ऊहापोह केलेला असून शेवटी सुमारे पाच ते आठ हजार शब्दांचे शुद्धलेखन त्यांच्या फक्त मूळ रूपापुरते दाखवले आहे. मुद्रितशोधन किंवा लेखन करताना शुद्धलेखनाची अडचण आल्यावर अशा पुस्तकांतून संबंधित नियम शोधायचा, वाचायचा, समजून घ्यायचा, अपवाद पाहायचे एवढ्या गोष्टी करण्याइतका वेळही नसतो आणि हे करणे सगळ्यांना जमतेच असे नाही. तावरे यांच्या कोशात तर नियमांची चर्चाही नाही. केवळ ७० पानांच्या या लहानशा कोशात सुमारे ६५०० शब्दांचे शुद्धलेखन त्यांच्या फक्त मूळ रूपापुरते दाखवले आहे.

यामुळे, मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे- शब्दाचे सामान्यरूप; अनेकवचन; तृतीया, पंचमी, सप्तमी यांची रूपे; सर्वनामांची विभक्तिरूपे; क्रियापदांची काळ व अर्थांनुरूप होणारी विविध रूपे; अनियमित शब्दांची आणि क्रियापदांची विशेष रूपे; अशी शुद्धलेखनाच्या संदर्भात विविध रूपे दाखवणारा ‘शुद्धलेखन कोश’ मराठीत आजवर उपलब्ध नव्हता. ही उणीव माझे मुद्रितशोधनाचे काम करताना मला वारंवार जाणवत होती. माझ्या सहकार्‍यांनाही जाणवत होती. त्यामुळे, या क्षेत्रातील एखाद्या जाणकार व्यक्तीने असा एखादा कोश करावा असे मला मनापासून वाटत होते, आणि अशा एखाद्या कोशाची मी उत्कंठेने व आशेने वाटही पाहत होतो. मात्र असा कोश आपण स्वत:च करावा असे कधीही मनात आले नव्हते.

मी कोश का केला?

सुमारे पाच वर्षांपूर्वी एक दिवस ‘कालनिर्णय’चे श्री. जयेंद्र साळगांवकर यांनी माझ्यावर पुढीलप्रमाणे एक काम सोपवले- संगणकावर इंग्लिश भाषेसाठी जशी ‘स्पेल चेक’ आज्ञावली असते तशी आज्ञावली एका व्यक्तीला संगणकावरच मराठी भाषेसाठी तयार करायची होती. ती व्यक्ती संगणकासाठी आज्ञावली तयार करायच्या क्षेत्रात जाणकार होती, परंतु अमराठी असल्यामुळे मराठी शुद्धलेखनाची अडचण होती. त्यामुळे ती व्यक्ती तिचे मित्र जयेंद्र साळगांवकर यांच्याकडे गेली आणि साळगांवकरांनी या कामासाठी मला बोलावले. नित्य व्यवहारातील सुमारे एक हजार शब्द निवडायचे आणि मराठी शुद्धलेखनानुसार त्यांची होणारी विविध रूपे लिहून द्यायची असे चाचणी स्वरूपाचे काम माझ्यावर सोपवण्यात आले. ही चाचणी यशस्वी झाल्यावर पूर्ण काम करायचे होते. मी माझे काम ठरलेल्या वेळेत सशुल्क करून दिले. परंतु मधल्या काळात त्या व्यक्तीला संगणकीय आज्ञावलीचे दुसरे मोठे काम मिळाल्यामुळे हा ‘मराठी स्पेलचेकर’चा विषय तिने सोडून दिला.

हे काम करत असताना अशा प्रकारच्या कोशाची उणीव मला अधिक प्रकर्षाने जाणवली, आणि हे काम संपत आले असताना ‘असा एक सविस्तर कोश आपण करावा’ असे विचार मनात येऊ लागले. मग त्यासाठी आवश्यक तेवढे प्राथमिक वाचन केले, दोन-तीन प्रकारचे नमुने तयार करून त्यांतील एक पक्का केला, आणि ‘कोणी करत नसेल तर ही गरज भागवायचा प्रयत्न आपणच करूया’ म्हणून या कोशाच्या कामाला सुरुवात केली. त्यामुळे या कोशाची मूळ प्रेरणा मला श्री. जयेंद्र साळगांवकर यांच्याकडून मिळाली असेच मी मानतो.

शब्दांची निवड

या कोशासाठी शब्द निवडताना मी मुख्यत: तीन निकष ठरवले. १) शब्दाच्या लेखनात इकार किंवा उकार किंवा दोन्ही असावेत. २) इकार आणि उकार दोन्ही नसलेल्या शब्दाला त्याच्या कुठल्यातरी रूपात विकार होत असावा. ३) या दोन्ही बाबी नसल्यास त्या शब्दाला शुद्धलेखनाच्या दृष्टिकोनातून काही विशेष महत्त्व असावे. यांपैकी पहिल्या दोनांतील एक किंवा दोन्ही निकष लागणारे भरपूर शब्द मिळतील हे आपल्याला माहीतच आहे. पण केवळ तिसरा निकष लागणारे ‘जादा, ज्योत्स्ना’ असे काही शब्द ‘ज्यादा, ज्योस्ना’ असे लिहिणे चुकीचे आहे हे दाखवण्यासाठी या कोशात घेतले आहेत. या तीनपैकी एक किंवा अधिक निकष लागणारे सर्वच शब्द या कोशात घेतलेले नाहीत. पृष्ठसंख्येचा विचार करता ते शक्यही नाही आणि तेवढी आवश्यकताही नाही. त्यामुळे हे निकष लावल्यावर जे मला महत्त्वाचे वाटले असे सुमारे २०,००० शब्द या कोशात त्यांच्या विविध रूपांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने दाखवले आहेत. हे शब्द कोणत्याही एका कोशातून घेतलेले नसून अनेक कोशांतून तर घेतले आहेतच, त्याशिवाय, हे काम करत असताना झालेले इतर वाचन आणि चर्चा यांतूनही काही शब्द घेतले आहेत. यांपैकी महत्त्वाच्या कोशांची यादी ‘संदर्भ ग्रंथसूची’त दिली आहे.

‘समग्रता’ हा मी कोणत्याही कोशाचा एक गुण मानतो. अर्थात; पृष्ठसंख्या, उपयोगिता अशा काही बाबींच्या संदर्भात हा गुण सापेक्ष ठरतो हे जरी खरे असले, तरी प्रत्येक कोशात एका किमान मर्यादेपर्यंत तो पाळणे शक्य असते. या कोशातही त्याच्या मर्यादेपर्यंत तो पाळण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. म्हणजे असे की, कोशात एका नक्षत्राचे नाव आले की सत्तावीस नक्षत्रांची नावे आलीच पाहिजेत, एका तिथीचे नाव आले की सोळा तिथ्यांची नावे आलीच पाहिजेत. अशा पद्धतीने वीसपेक्षा अधिक समूहयाद्या तयार करून त्यांतील सर्व शब्द या कोशात घेतले आहेत.

क्रमवाचक विशेषणांच्या बाबतीत सर्वच विशेषणांचे सामान्यरूपही होते, आणि विशेष्यानुसार बदलणारी चार रूपेही होतात. परंतु या कोशात प्रथम पहिला ते तेरावा अशा पहिल्या तेराच विशेषणांची रूपे दाखवली आहेत. कारण, आपल्या काही धार्मिक रूढींनुसार या तेरा विशेषणांचा वापर आपल्या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर होतो. यानंतर एकदम एकोणिसावा ते अठ्ठेचाळिसावा एवढ्या क्रमवाचक विशेषणांची रूपे दाखवली आहेत. कारण इथे मूळ संख्येतील उपा्नत्य इकार दीर्घ असून संख्येचे क्रमवाचक रूप होताना तो र्‍हस्व होतो हे दाखवायचे आहे. यानंतर एकदम एकोणऐंशीवा ते अठ्ठ्याऐंशीवा एवढी क्रमवाचक विशेषणांची रूपे दाखवली आहेत. कारण इथे मूळ संख्येतील अ्नत्याक्षराचा दीर्घ इकार संख्येचे क्रमवाचक रूप होतानाही दीर्घच राहतो हे दाखवायचे आहे. इतर क्रमवाचक विशेषणांच्या बाबतीत मूळ संख्येचे लेखन दाखवल्यानंतर तिचे क्रमवाचक रूप लिहिणे अगदीच सोपे असल्यामुळे ही रूपे या कोशात दाखवलेली नाहीत. यानंतर एकदम शंभरावा ते हजारावा अशी शेकड्याच्या पटीतील दहा क्रमवाचक विशेषणे एक टप्पा म्हणून दाखवली आहेत.

धातूंना ‘णे’ हे कृदन्त लागून धातूंपासून क्रियापदे तयार होतात, आणि ही सर्वच क्रियापदे आपण भाषेत नामे म्हणूनही वापरू शकतो. परंतु अशी सर्वच क्रियापदे आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात नामे म्हणून वापरत नाही. त्यामुळे ‘घेणे, देणे, बोलणे, येणे’ यांसारखी नामे म्हणून सररास वापरली जाणारी काही मोजकी क्रियापदे नामे म्हणूनही दाखवून त्यांची रूपे दाखवली आहेत.

काही क्रियाविशेषणांना ‘चा, ला’ हे प्रत्यय लागून त्यांची विशेषणे होतात. हे प्रत्यय लागताना ज्या क्रियाविशेषणांच्या मूळ रूपात काही फरक होतो, अशाच क्रियाविशेषणांपासून तयार होणारी विशेषणे या कोशात घेऊन त्यांची रूपे दाखवली आहेत. म्हणजे, ‘इकडे’ या क्रियाविशेषणाला ‘चा, ला’ हे प्रत्यय लागताना प्रथम त्याचे ‘इकड’ असे रूप होते आणि मग त्यापासून ‘इकडचा, इकडला’ अशी विशेषणे तयार होतात. याचप्रमाणे इथे, खाली, जिथे, तिकडे, तिथे, पुढे, मागे; यांसारख्या काही क्रियाविशेषणांपासून होणारी विशेषणे घेतली आहेत. मात्र; आत, बाहेर, वर, समोर; यांसारख्या क्रियाविशेषणांपासून ‘चा, ला’ प्रत्यय लागून होणारी विशेषणे या कोशात घेतलेली नाहीत. कारण, यांच्या लेखनात अडण्यासारखे काही नाही.

आपण आपल्या बोलण्यात आणि लेखनात अनेक इंग्लिश शब्द वापरतो. खरे तर यांतल्या कित्येक इंग्लिश शब्दांना सुलभ आणि सुयोग्य मराठी पर्याय उपलब्ध असूनही आपण त्यांऐवजी इंग्लिश शब्द वापरण्याची चूक कळत-नकळत करत असतो. त्यामुळे आपण जेवढे वापरतो तेवढे सर्वच इंग्लिश शब्द या कोशात घेतलेले नाहीत. कोणते इंग्लिश शब्द घ्यायचे याचा निर्णय मी पुढीलप्रमाणे घेतला- १९७३ साली महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयाने ‘शासन व्यवहार कोश’ या नावाने इंग्लिश-मराठी कोश प्रसिद्ध केला. या कोशावर दहाएक मान्यवर व्यक्तींनी सल्लागार म्हणून काम केले आहे. या कोशात मराठी अर्थ म्हणून जे इंग्लिश शब्द तसेच ठेवले आहेत असे सर्व इंग्लिश शब्द या कोशात ‘स्वीकृत इंग्लिश शब्द’ असे समजून घेतले आहेत. याशिवाय काही रासायनिक मूलद्रव्यांची नावेही घेतलेली आहेत. ‘अ‍ॅक्सिडेंट, किचन, क्यू, सिलेक्शन’ यांसारखे अकारणच वापरले जाणारे इंग्लिश शब्द मात्र या कोशात घेतलेले नाहीत. या शब्दांऐवजी मराठी माणसाने ‘अपघात, स्वयंपाकघर, निवड, रांग’ हेच रूढ मराठी शब्द वापरण्याची सवय जाणीवपूर्वक लावून घेतली पाहिजे. आपण मराठीत बोलण्याचा जेवढा अधिक प्रयत्न करू तेवढे मराठी शुद्धलेखनाकडे आपले अधिक लक्ष जाईल.

अलीकडच्या काळात रूढ झालेले काही पारिभाषिक शब्द, जे आत्तापर्यंतच्या शब्दार्थकोशांमध्ये सापडत नाहीत ते, या कोशात घेणे मला महत्त्वाचे वाटले. त्याचप्रमाणे काही महत्त्वाचे सामाजिक आणि साहित्यिक शब्दही घेणे आवश्यक वाटले. असे शब्द अनुक्रमे मराठी विश्वकोशाचा परिभाषासंग्रह खंड, भारतीय समाजविज्ञान कोशाचा पारिभाषिक शब्दसंग्रह खंड, आणि भाषा संचालनालयाचा साहित्य समीक्षा परिभाषा कोश; या तीन कोशांतून निवडून घेतले आहेत.

जेणेकरून, ‘लेखन किंवा मुद्रितशोधन करताना गरजवंताला या कोशाचा जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे’ या दृष्टिकोनातून कोशातील शब्दांची व्याप्ती ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

अडचणी आणि मार्ग

नादानुकारी किंवा ध्वन्यनुकारी शब्दांच्या लेखनाबाबत मोठ्या प्रमाणात विसंगती आढळते. या बाबतीत ‘मराठी साहित्य महामंडळा’च्या नियम क्र. ११मध्ये सुरुवातीला म्हटले आहे- ‘हळूहळू, मुळूमुळू, खुटूखुटू, या शब्दांतील दुसरा स्वर व चौथा स्वर दीर्घ लिहावा.’ तर शेवटी म्हटले आहे- ‘परंतु पुनरुक्त शब्द नादानुकारी असतील तर ते उच्चाराप्रमाणे र्‍हस्व लिहावे. उदा. - लुटुलुटु, दुडुदुडु, रुणुझुणु.’ आता ‘हळूहळू, मुळूमुळू, खुटूखुटू’ यांतील ‘मुळूमुळू’ या शब्दाचा कोशातील अर्थ ‘हळू आवाजात (रडणे)’ असा आहे. म्हणजे या शब्दात नाद किंवा ध्वनी आहे. मग हा शब्द नादानुकारी धरून ‘मुळुमुळु’ असा का लिहायचा नाही? आणखी एक गोष्ट म्हणजे महामंडळाची नियमपुस्तिका, शुद्धलेखन प्रदीप, आणि शुद्धलेखन विवेक या तिन्ही संदर्भसाधनांमध्ये हा नियम आणि त्याची उदाहरणे देताना सर्वांनी चारही अक्षरांना उकार असलेले शब्दच निवडले आहेत. चारही अक्षरांना इकार येईल तेव्हा काय? – उदा. फिदिफिदि. किंवा फक्त दुसर्‍या आणि चौथ्या अक्षराला इकार किंवा उकार येईल तेव्हा काय? उदा. - किरकिर, गुणगुण. याबाबत कोणीही स्पष्टीकरण दिलेले नाही आणि असे शब्द उदाहरणात घेतलेले नाहीत. वाळंबे, गोखले, तावरे यांच्या शुद्ध शब्दसूच्या पाहाव्यात तर अशा शब्दांच्या बाबतीत या सूच्यांमध्ये एकत्रितपणे किंवा स्वतंत्ररीत्याही एकवाक्यता आढळत नाही. त्यामुळे अशा शब्दांचे लेखन कसे दाखवायचे ही अडचण होती. यासाठी शोध घेतल्यावर मोरो केशव दामले यांनी लिहिलेल्या, आणि कृष्ण अर्जुनवाडकर यांनी संपादित केलेल्या ‘शास्त्रीय मराठी व्याकरण’ या ग्रंथात ‘अभ्यस्त शब्द’ या प्रकरणात ‘अनुकरणवाचक’ या उपमथळ्याखाली या शब्दांबाबतची सविस्तर व्याख्या सापडली ती अशी- ‘स्पष्ट किंवा अस्पष्ट, वास्तविक किंवा काल्पनिक ध्वनीचे वाचक आणि त्या ध्वनीचे अल्पांशाने तरी अनुकरण करणारे म्हणजे त्या ध्वनीशी जरासे तरी जुळणारे असे जे स्वरूपत: अभ्यस्त शब्दांसारखे दिसणारे किंवा वास्तविक अभ्यस्त शब्द त्यांस अनुकरणवाचक शब्द असे म्हणतात.’ या व्याख्येखाली उदाहरणादाखल दिलेल्या शब्दांमध्ये ‘किरकिर, चुणचुण, पिरपिर, पुटपुट, बुरबुर, मिरमिर, मुरमुर, हुरहुर’ असे शब्द दिलेले आहेत. हे वाचून समाधान झाल्यावर ही व्याख्या समोर ठेवून आणखी शोध घेतला तेव्हा अग्निहोत्रींच्या ‘अभिनव शब्दकोशा’च्या पाच खंडांत, आणि दाते-कर्वे यांच्या ‘महाराष्ट्र शब्दकोशा’च्या सात खंडांत अशा ध्वन्यनुकारी किंवा अनुकरणवाचक शब्दांच्या बाबतीत एकवाक्यता आढळली. म्हणजे या शब्दांतील चारही इकार किंवा उकार, किंवा पहिला आणि तिसरा इकार किंवा उकार, हे र्‍हस्व दाखवलेले आढळले. त्यामुळे असे ध्वन्यनुकारी शब्द या कोशात वरील व्याख्येप्रमाणे घातलेले असून पुढे (ध्व.) असे स्पष्टीकरण दिले आहे. ‘कोश कसा पाहावा’ ह्या सुरुवातीच्या स्पष्टीकरणात ‘ध्व.= ध्वनिवाचक शब्द’ असे संक्षेपाचे पूर्ण रूप दाखवले आहे.

दुसरी महत्त्वाची अडचण आली ती संख्या आणि त्यांची रूपे दाखवताना. मी संदर्भासाठी वापरलेल्या पाचही महत्त्वाच्या कोशांमध्ये एक ते शंभर ह्या संख्या केवळ विशेषण म्हणून दाखवल्या आहेत. परंतु शून्य, लक्ष, कोटी, अब्ज, खर्व, निखर्व, महापद्म, परार्ध अशा संख्या मात्र विशेषणांबरोबरच नामे म्हणूनही दाखवल्या आहेत आणि त्यांची लिंगेही दाखवली आहेत. जर या संख्या नामे असू शकतात तर एक ते शंभर या संख्या नामे का असू शकत नाहीत, याचे कोणतेही शास्त्रीय कारण मला आढळले नाही. म्हणून माझ्या या कोशात मी एक ते शंभर या संख्या विशेषण म्हणून तर दाखवल्या आहेतच, शिवाय नाम म्हणूनही दाखवून त्यानुसार त्यांची रूपे दाखवली आहेत. मराठी शब्दार्थकोशांमध्ये या संख्यांना केवळ विशेषण म्हणण्याची रूढी मोडून मी प्रथमच माझ्या कोशात त्यांना नामही म्हटले आहे, आणि या नामाचे लिंग पुल्लिंग ठेवले आहे. हे संख्यावाचक शब्द आपण आपल्या व्यवहारात ज्या पद्धतीने वापरतो ती पद्धत आणि इतर रूढ नामे यांचा तुलनात्मक अभ्यास करून मी हा निर्णय घेतला. ही तुलना इथे सविस्तर न मांडता उदाहरणादाखल खाली काही वाक्ये देतो. ती पाहिल्यावर यांतील संख्यावाचक शब्द विशेषणे नाहीत हे सहज समजेल.

तू दोन लिहिला आहेस का तीन ते कळत नाही.

आठाला दोन आणि चार यांनी भाग जातो.

त्याला अडतीस लिहिता येत नाही.

मुलांनो, पंचविसातून सतरा वजा करा.

दोन पाचांचे दहा होतात.

तिसरी अडचण आली ती अकारविल्हे मांडणी कशी ठेवायची याची. उपलब्ध कोशांमध्ये प्रत्येक कोशात वेगवेगळ्या पद्धतीने अकारविल्हे मांडणी केलेली आढळते, पण आपल्या कोशातील अकारविल्हे मांडणी कशी ठेवली आहे याचे स्पष्टीकरण कोणत्याही कोशात दिलेले आढळत नाही. त्यामुळे कोश पाहायच्या आधी त्याची अकारविल्हे मांडणी काही शब्द पाहून शोधून काढावी लागते आणि मग कोश पाहता येतो. नाहीतर काही शब्द कोशात असूनही सापडत नाहीत असे होते. मराठीतील प्रसिद्ध भाषावैज्ञानिक डॉ.९अशोक रा.९केळकर यांनी त्यांच्या ‘वैखरी’ या पुस्तकात ‘मराठी देवनागरी वर्णक्रमी’ या लेखात मराठीच्या ज्या अकारविल्हे मांडणीची शिफारस केली आहे तीच मांडणी मी माझ्या कोशात ठेवली आहे. मराठी विश्वकोशानेही हीच मांडणी स्वीकारली आहे. मी फक्त ‘अ‍ॅ’ आणि ‘ऑ’ या उच्चारांच्या जागा विश्वकोशाप्रमाणे ठेवल्या आहेत. ही मांडणी पुढे ‘अकारविल्हे मांडणी’ या लेखात सविस्तर समजावून दिली आहे.

शुद्धलेखनविषयक आजची परिस्थिती

शिक्षण, लेखन आणि मुद्रितशोधन या तीन घटकांचा शुद्धलेखनविषयक परिस्थितीचे बरेवाईट करण्यात मोठा वाटा असतो असे मला वाटते. शुद्धलेखनाच्या संदर्भात यांची परिस्थिती आज काय आहे ते पाहू.

मी मुद्दाम पाचवी ते दहावी अशा सर्व इयत्तांची मराठीची पुस्तके विकत घेतली. त्यांतील धड्यांच्या मागे दिलेल्या शुद्धलेखनविषयक अभ्यासाची इयत्तावार नोंद केली. तेव्हा मला असे आढळून आले की, महामंडळाने केलेल्या शुद्धलेखनाच्या अठरा नियमांपैकी नियम क्रमांक १, ३, ५, ६, ८, ९, ११, १२ एवढे आठच नियम पाचवी ते सातवी या तीन इयत्तांमध्ये मिळून शिकवले जातात. आठवीच्या पुस्तकात सर्व भर फक्त समास व संधी यांवर दिला आहे. नववी आणि दहावीच्या पुस्तकांत प्रत्येक धड्याच्या शेवटी ‘पुढील शब्द असेच लिहा’ अशा मथळ्याखाली पाच-सात शब्द, तेही त्यांच्या फक्त मूळ रूपात, दाखवले आहेत इतकेच. नाही म्हणायला, या दोन इयत्तांच्या पुस्तकांच्या शेवटी महामंडळाची नियमावली छापली आहे. म्हणजे हे सर्व अठरा नियम दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शिकवलेच गेलेले नसतात. त्यापुढची गंमत अशी की, शालेय आयुष्यानंतर पुढे मराठी हा विषय घेऊन बी.ए. किंवा एम.ए. होईपर्यंतच्या अभ्यासक्रमातही शुद्धलेखनाचा अभ्यास पुन्हा कधीही घेतला जात नाही.

महामंडळाने प्रथम १९६२ साली मराठी शुद्धलेखनाचे १४ नियम केले आणि महाराष्ट्र शासनाने त्यांना मान्यता दिली त्याला आज ३८ वर्षे झाली, आणि त्यानंतर १९७२ साली या नियमांमध्ये ४ नियमांची भर टाकून हे नियम १८ केले त्याला आज २८ वर्षे झाली. एवढ्या काळात, ‘हे नियम शिक्षण क्षेत्रात खरोखरच नीट शिकवले जातात का९?’ या गोष्टीकडे ना महामंडळाने लक्ष दिले ना शासनाने.

मुळात महामंडळाचे हे अठरा नियम सर्व शब्दांची सर्व रूपे दाखवण्यासाठी अपुरे पडतात. त्यात पुन्हा जे आहेत ते सगळे शैक्षणिक आयुष्यात कधी शिकवले जात नाहीत. अशा परिस्थितीत समाजाकडून शुद्धलेखनाची अपेक्षा करणेच चुकीचे आहे.

लेखन आणि मुद्रितशोधन या दोन बाबींचा विचार एकत्रितपणे करता येईल. कारण, लेखकाने लिहिलेल्या अशुद्ध लेखनाचा त्रास ते मुद्रणाला गेल्याशिवाय होत नाही, आणि मुद्रण करतानाच मुद्रितशोधनाची गरज भासते. लेखक आणि मुद्रितशोधक हे दोघेही गेल्या वीसएक वर्षांत शिक्षण घेतलेले असतील तर, वर नमूद केल्याप्रमाणे शुद्धलेखन-शिक्षणाचा अभाव असलेल्या शिक्षणपद्धतीत शिकलेल्या या दोघांचेही शुद्धलेखनाचे ज्ञान फारसे चांगले नसण्याची शक्यताच जास्त असते. प्रकाशकही चांगल्या मुद्रितशोधकाला अधिक मानधन देऊन त्याच्याकडून मुद्रितशोधन करून घेण्याचे कष्ट घेत नाहीत, कारण पुस्तकात चुका राहिल्या तरी त्याच्या विक्रीवर परिणाम होत नाही, कारण या चुका आहेत हे कळणारा वर्गच फार लहान आहे. त्यामुळे अलीकडे प्रकाशित होणार्‍या अनेक पुस्तकांमध्ये प्रत्येक पानावर पाच-सात चुका आढळतात. दैनिके आणि दूरदर्शन या माध्यमांतून शुद्धलेखनाचे कसे हाल होतात हे आपण रोजच वाचतो आणि पाहतो.

अर्थात, या परिस्थितीत ‘दोष ना कुणाचा’ अशी स्थिती आहे हे मान्य केले, तरी याचेही भान ठेवले पाहिजे की, ‘पराधीन’ मात्र आत्ताची आणि येणारी पिढी आहे. त्यांच्यासाठी तरी, एकतर शुद्धलेखन-शिक्षण नीट दिले जाईल अशी शिक्षणपद्धती तयार केली पाहिजे; नाहीतर, शुद्धलेखनप्रेमी मंडळींनी शाळा-शाळांतून अल्प मुदतीचा शुद्धलेखनविषयक अभ्यासक्रम शिकवायचे मनावर घेतले पाहिजे.

ऋणनिर्देश

मी आधी म्हटल्याप्रमाणे माझे मित्र ‘कालनिर्णय’चे श्री. जयेंद्र साळगांवकर यांनी विश्वासाने माझ्यावर सोपवलेल्या छोट्याशा कामातून प्रेरणा घेऊन सुमारे पाच वर्षांपूर्वी सुरू केलेले शुद्धलेखन कोशाचे हे काम, व्यवसायाच्या व्यापातून वेळ मिळेल तसे करत करत, आज पूर्ण होत असल्याचा अतिशय आनंद होत आहे.

या कामाला सुरुवात केली तेव्हा, अभिजात संपादक आणि माझे आदरस्थान श्रीयुत श्री. पु. भागवत यांना मी स्वत:शी पक्का केलेला नमुना दाखवला आणि कोशाच्या एकूण रचनेसंबंधी माझे विचार त्यांना सांगितले. या बाबतीत मला त्यांच्याकडून अतिशय मोलाचे मार्गदर्शन तर मिळालेच शिवाय कोशाच्या संपूर्ण कामातही वेळोवेळी अनेक प्रकारे त्यांचे सहकार्य लाभले.

‘केशव भिकाजी ढवळे’ या सध्याच्या शतकोत्तर वाटचालीतल्या सुप्रसिद्ध प्रकाशन संस्थेच्या संचालिका ज्योती धनंजय ढवळे यांच्याकडे या कोशाच्या प्रकाशनाविषयी विचारणा करताच त्यांनी तत्काळ होकार दिला आणि आमचे घरगुती संबंध अधिकच दृढ केले.

काही निमित्ताने, राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालिका डॉ. सरोजिनी वैद्य यांनी माझे हे कोशाचे काम पाहिले आणि त्याबद्दल समाधानही व्यक्त केले. त्यांची संस्था अशा प्रकारच्या ग्रंथनिर्मितीला प्रोत्साहन देणारी असल्यामुळे आणि माझे काम त्यांना समाधानकारक वाटल्यामुळे त्यांनी या कामात मला सहकार्य केले. सुरुवातीला आवश्यक तेवढे प्राथमिक वाचन आणि नंतर गरजेप्रमाणे त्या-त्या बाबीचे सविस्तर वाचन असे करून मी हा कोश अतिशय काळजीपूर्वक करत होतो. तरीही, मराठी भाषेचे माझे कोणतेही खास शिक्षण झालेले नसल्याने माझ्या या कामाचे या क्षेत्रातल्या एखाद्या तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तीकडून मार्गदर्शक या नात्याने एकदा अवलोकन व्हावे असे मला वाटत होते. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख डॉ. श्री. गं. ना.जोगळेकर यांनी श्री. पु. भागवत यांच्या विनंतीवरून हे काम करण्याचे मान्य केले आणि माझ्यासमोरील एक मोठा प्रश्न सोडवला. डॉ. जोगळेकर यांचा भाषाविज्ञानाचा सखोल अभ्यास आणि कठीण गोष्ट सुलभ करून सांगण्याचे त्यांचे कौशल्य यांमुळे त्यांचे मार्गदर्शन मला अतिशय उपयुक्त ठरले.

ठाण्याच्या बा. ना. बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाचे ग्रंथपाल आणि मराठीचे प्राध्यापक असलेले माझे मित्र श्री. मोहन पाठक, तसेच मुद्रितशोधन क्षेत्रातील माझा सहकारी विवेक फडके या दोघांनी हा संपूर्ण कोश मित्रत्वाच्या नात्याने एकदा वाचून दिला आणि काही महत्त्वाच्या सूचना केल्या.

सूचीकार म्हणून प्रसिद्ध असलेले डोंबिवलीचे श्री. शरद साठे यांनी माझे हे काम पाहून त्यांच्याकडचा ‘शास्त्रीय मराठी व्याकरण’ हा कृष्ण अर्जुनवाडकर संपादित मूळ मोरो केशव दामले यांचा बहुमोल ग्रंथ मला अभ्यासासाठी दिला. या संपूर्ण कामात या ग्रंथाचा फारच मौलिक उपयोग झाला.

त्याचप्रमाणे, पुण्याच्या समाजविज्ञान मंडळाचे संचालक आणि भारतीय समाजविज्ञान कोशाचे प्रमुख संपादक श्री. स. मा. गर्गे यांनी मला माझ्या या कामासाठी वि.का.राजवाडे यांचा ‘राजवाडे मराठी धातुकोश’ दिला. क्रियापद विभागासाठी या कोशाचा खूपच उपयोग झाला.

अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक पुस्तकांचे संपादक, सिद्धहस्त कवी, आणि प्रसिद्धीने ‘संस्कृत पंडित’ म्हणून ओळखले जाणारे ठाण्याचे श्री. दिवाकर घैसास म्हणजे ठाण्यातला माझा सगळ्यात जवळचा आधार. मी त्यांना अनेक वेळा दूरध्वनीवरून आणि माझ्या कार्यालयात बोलावून माझ्या कितीतरी शंकांचे निरसन करून घेतले आहे.

आणखीही काही व्यक्तींनी कधी दूरध्वनीवरून एखाद्या प्रश्नाचे उत्तर देऊन तर कधी एखाद्या व्यक्तीचे किंवा पुस्तकाचे नाव सुचवून माझ्या या कामात वेळोवेळी मदत केली आहे.

आणि कितीही घरचे म्हटले तरी माझ्या घरातील माझे सर्व कुटुंबीय आणि अक्षय फोटोटाइपसेटर्सचे सर्व सहकारी यांचेही या कोशाच्या कामात लाभलेले प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य नाकारता येणार नाही.

या सर्वांचा मी अतिशय मन:पूर्वक ऋणी आहे.

समारोप

‘शुद्ध-लेखन शुद्ध-मुद्रण शब्दकोश’ या मराठीतल्या तत्कालीन पहिल्या शुद्धलेखन कोशाचे मार्गदर्शक शंकर रामचंद्र दाते यांनी १९६१ साली त्यांच्या प्रस्तावनेत म्हटले आहे- ‘आम्ही तर हा कच्चा खर्डा आहे असेच समजतो.’ या कच्च्या खर्ड्यात मी माझ्या अल्पबुद्धीने जमेल तशी आणि जमेल तेवढी सुधारणा करून मराठी शुद्धलेखनाच्या प्रचलित नियमांनंतरचा हा पहिला ‘मराठी लेखन-कोश’ गरजवंतांसमोर, अभ्यासकांसमोर आणि परीक्षकांसमोर ठेवत आहे. माझ्याकडून अनवधानाने किंवा माझ्या अज्ञानाने या कोशात काही त्रुटी, काही दोष राहिले असतील. हा कोश वापरणार्‍या कोणाही व्यक्तीने यातील त्रुटी आणि दोष मला कळवावेत अशी मी विनंती करतो. पुढच्या आवृत्तीच्या वेळी त्यांचा विचार अवश्य केला जाईल. मुळात, ‘मी एखादा कोश लिहू शकतो’ ह्या माझ्यातील पात्रतेची मला जाणीव करून दिली ती १९९३ सालाच्या मध्यात धनंजयराव ढवळे यांनी. त्यांच्या मनात विविध प्रकारच्या कोशांच्या योजना होत्या, परंतु त्यांतील एकही फलद्रूप होण्याआधीच, दुर्दैवाने, जानेवारी १९९९मध्ये कर्करोगाने त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला. त्यांच्या हयातीत मी त्यांना एकही कोश पूर्ण करून देऊ शकलो नाही, ही खंत माझ्या मनात कायम राहील. त्यामुळे, हा छोटासा पण मराठीतील अगदी वेगळ्या स्वरूपाचा कोश ‘केशव भिकाजी ढवळे’ प्रकाशनाला देताना थोडेतरी उतराई झाल्याचे समाधान वाटत आहे.

अरुण फडके

१ जानेवारी २००१


Next Post