आपली वर्णमाला आणि शुद्धलेखन

बुधवार दि. २० फेब्रुवारी २००८ रोजी पुणे येथे मॉडर्न कॉलेज आणि राज्य मराठी विकास संस्था ह्यांच्या संयुक्त विद्यमाने शुद्धलेखन ह्या विषयावर संपूर्ण दिवसाचे चर्चासत्र आयोजित केले आहे. त्यानिमित्ताने, मराठीची वर्णमाला आणि शुद्धलेखन ह्यांचा परस्पर संबंध दाखवणारा लेख.

लेखक अरुण फडके, दिनांक February 21, 2008 · 9 mins read
बुधवार दि. २० फेब्रुवारी २००८ रोजी पुणे येथे मॉडर्न कॉलेज आणि राज्य मराठी विकास संस्था ह्यांच्या संयुक्त विद्यमाने शुद्धलेखन ह्या विषयावर संपूर्ण दिवसाचे चर्चासत्र आयोजित केले आहे. त्यानिमित्ताने, मराठीची वर्णमाला आणि शुद्धलेखन ह्यांचा परस्पर संबंध दाखवणारा लेख.

आपली वर्णमाला आणि शुद्धलेखन

— आपली शास्त्रीय वर्णमाला —

स्वर, स्वरादी आणि व्यंजने अशा सर्व प्रकारच्या वर्णांची क्रमवार मालिका म्हणजे वर्णमाला. आपल्या प्रचलित मराठी वर्णमालेत ४८ वर्ण असून त्यांची विभागणी अशी आहे—

  • १२ स्वर : अ आ इ ई उ ऊ ऋ लृ ए ऐ ओ औ
  • २ स्वरादी : (अनुस्वार) : (विसर्ग)
  • ३४ व्यंजने : क् ख् ग् घ् ङ्; च् छ् ज् झ् ञ्; ट् ठ् ड् ढ् ण्; त् थ् द् ध् न्; प् फ् ब् भ् म्; य् र् ल् व्; श् ष् स्; ह् ळ्.

बारा स्वरांपैकी ‘लृ’ ह्या स्वराचा उपयोग करून होणारा ‘क्लृप्ती= युक्ती’ हा एकमेव शब्द मराठीत आहे. एरवी ह्या स्वराचा वापर कुठेही होत नाही. म्हणूनच बाराखडीतील अक्षरांमध्ये ह्या स्वराचे अक्षर घेत नाहीत. परंतु ‘ऋ’ ह्या स्वराने युक्त असलेले अक्षर मात्र बाराखडीत घेतले पाहिजे.

— स्वरादी म्हणजे काय —

आरंभी कोणतातरी स्वर आल्याखेरीज स्वतंत्रपणे न उच्चारता येणारे ध्वनी, म्हणजे स्वरादी. नुसता अनुस्वार आणि नुसता विसर्ग ह्यांचा उच्चार करता येत नाही. किंबहुना ह्यांना स्वतःचा उच्चारच नाही. ह्यांचा उच्चार दाखवण्यासाठी ह्या वर्णांच्या आधी एक स्वर घेऊन अ+ = अं आणि अ+ := अः असा ह्यांचा प्रत्येकी एक उच्चार उदाहरण म्हणून दाखवला जातो. ह्या वर्णांच्या ‘आधी’ स्वर घ्यावा लागतो म्हणून ह्यांना स्वरादी म्हणतात. केवळ उदाहरण म्हणून पहिल्या अक्षरात हे वर्ण मिळवून दाखवण्याची पद्धत आहे. अन्यथा सर्व स्वरांमध्ये हे दोन्ही स्वरादी मिळवून अं आं इं ईं ह्याप्रमाणे औं-पर्यंत १२ अक्षरे होऊ शकतात; आणि अः आः इः ईः ह्याप्रमाणे औः-पर्यंत आणखी बारा अक्षरे होऊ शकतात. म्हणूनच बाराखडीत केवळ कं, कः; खं, खः; अशी दोन-दोनच अक्षरे दाखवणे अयोग्य आहे.

भाषेच्या दृष्टिकोनातून पाहता वर्णमाला ही अतिशय मूलभूत आणि शास्त्रीय बाब आहे. त्यामुळे तिचे योग्य असे शिक्षण सर्वांनाच मिळणे आवश्यक आहे. मात्र, वरीलप्रमाणे १२ स्वर, २ स्वरादी आणि ३४ व्यंजने असलेली आपली शास्त्रीय वर्णमाला चौथी इयत्तेमध्ये फक्त शिष्यवृत्ती परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांनाच शिकवली जाते असे दिसते. त्यामुळे हे विद्यार्थी सोडले, तर बहुधा इतर सर्वच विद्यार्थी ‘अं, अः’ ह्यांना स्वरच समजत असतात. बाजारात उपलब्ध असलेले काही तक्ते आणि पुस्तके ह्यांमध्येही ‘अं, अः’ ह्यांचा उल्लेख स्वर म्हणूनच केलेला आढळतो आणि हे साहित्य सररास विकले जात असल्याचे आढळते. मुळात, वर्णमाला शिकवताना, शिष्यवृत्ती परीक्षेचे विद्यार्थी आणि इतर विद्यार्थी असा भेदभाव कशाकरता तेच कळत नाही.

— आपली शास्त्रीय बाराखडी —

प्रत्येक व्यंजनात क्रमाने प्रत्येक स्वर मिळवून प्रत्येक व्यंजनाची तयार होणारी क्रमवार अक्षरे म्हणजे बाराखडी. उदाहरणासाठी ‘क्’ ह्या व्यंजनात क्रमाने बारा स्वर मिळवले, तर ‘क्’ची शास्त्रीय बाराखडी कशी तयार होते ते पाहू. क्+ अ= क, क्+ आ= का; ह्याप्रमाणे-

क का कि की कु कू कृ क्लृ के कै को कौ

मात्र स्वरांच्या स्पष्टीकरणात म्हटल्याप्रमाणे लृ ह्या स्वराचा उपयोग मराठीत फक्त क ह्या अक्षरापुरताच होऊ शकतो. त्यामुळे ख् ते ळ् ह्या व्यंजनांच्या बाराखड्या करताना ख्लृ, ग्लृ, घ्लृ अशी उच्चार न करता येणारी आणि भाषेत न लागणारी अक्षरे शिकण्याची काहीही गरज नाही. त्यामुळे क-पुढील व्यंजनांच्या बाराखड्यांमध्ये पुढीलप्रमाणे अकराच अक्षरे असतील—

ख खा खि खी खु खू खृ खे खै खो खौ

बाराखडीत केवळ कं, कः; खं, खः; अशी दोन-दोनच अक्षरे दाखवणे अयोग्य आहे, असा उल्लेख स्वरादीच्या स्पष्टीकरणात केला आहे. कारण बाराखडीतील कोणत्याही अक्षरावर अनुस्वार देता येतो आणि कोणत्याही अक्षरापुढे विसर्ग देता येतो. ह्याचाच अर्थ असा की, आपल्याला ‘अं, अः; कं, कः, खं, खः’ ही अक्षरे शिकायची नसून ‘अनुस्वार’ आणि ‘विसर्ग’ हे स्वरादी शिकायचे असतात. ह्या स्वरादींचा वापर कोणत्याही अक्षरावर करता येऊ शकतो हे शिकायचे असते. अगदी जोडाक्षरावरसुद्धा असा वापर करता येतो.

— शास्त्रीय बाराखडी न शिकण्याचे दुष्परिणाम —

आपण अगदी लहान वयात बाराखडी शिकतो आणि पुढे तोच क्रम आपल्याला माहीत असतो. प्रचलित बाराखड्यांमध्ये ‘कृ, खृ, गृ, घृ’ ही ऋ-स्वरयुक्त अक्षरे नसतातच. त्यामुळे ह्या अक्षरांचा क्रम दीर्घ उकारानंतर आहे, ही गोष्ट पुढे पदवीधर होईपर्यंतही माहीत नसते असे दिसते. परिणामी ‘ऋ’ ह्या स्वराने सुरू होणारे ‘ऋण, ऋतू, ऋषी’ ह्यांसारखे; आणि हा स्वर मिसळून तयार होणारे ‘कृत्य, गृहिणी, तृष्णा, दृश्य, नृप, पृथ्वी, बृहत, भृगू, मृग, वृत्त, शृंगार, सृष्टी, हृदय’ ह्यांसारखे कितीतरी शब्द कोशामध्ये संबंधित ‘ऊ’कारानंतर सापडतील हे विद्यार्थ्यांना माहीत नसते. किंबहुना ऋ-युक्त अक्षरे ही जोडाक्षरे आहेत असा गैरसमज तयार होत असल्यामुळे हे शब्द कोशात शोधताना ते संबंधित ‘औ’कारानंतर सुरू होणार्‍या जोडाक्षरांमध्ये शोधले जातात. तिथे ते न सापडल्यामुळे कोशकाराबद्दल आणि कोशाबद्दल वाईट मत तयार होऊन तो कोश बाजूला टाकला जातो. परिणामी इतर कित्येक शब्दांच्या योग्य लेखनाबद्दल आणि अर्थांबद्दल कोशात दिलेल्या माहितीपासून विद्यार्थी वंचित राहतात. त्यामुळे अशुद्धलेखनाची रूढी तयार होऊ लागते आणि मग ‘शुद्धलेखनामध्ये रूढीला काहीच महत्त्व नसते का’ असे प्रश्न विनाकारणच जोर धरू लागतात.

— र्‍हस्व स्वर आणि दीर्घ स्वर —

प्रचलित मराठी वर्णमालेतील ‘अ, इ, उ, ऋ, लृ’ हे ५ स्वर र्‍हस्व असून ‘आ, ई, ऊ, ए, ऐ, आ, औ’ हे ७ स्वर दीर्घ आहेत. र्‍हस्व स्वर आणि दीर्घ स्वर ह्यांची माहिती असणे शुद्धलेखनासाठी आवश्यक असते. मराठी शब्दांमधील शेवटच्या अक्षरातील स्वर दीर्घ असेल, तर उपान्त्य अक्षराचा इकार किंवा उकार र्‍हस्व असतो, जसे— खजिना, नमुना; फजिती, मेहुणी; पिसू, सुरू; पाहिजे, कुठे; निघो, तुटो. त्याचप्रमाणे, मराठी शब्दांमधील शेवटच्या अक्षरातील स्वर र्‍हस्व असेल, तर उपान्त्य अक्षराचा इकार किंवा उकार दीर्घ असतो, जसे— ठरावीक (ठराविक×), दुर्बीण (दुर्बिण×), दुर्मीळ (दुर्मिळ×), माणूस.

— सजातीय स्वर आणि विजातीय स्वर —

स्वरांच्या उच्चारस्थानांनुसार त्यांची विभागणी केली आहे. एकाच स्थानातून उच्चारल्या जाणार्‍या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. अ—आ, इ—ई, उ—ऊ, ए—ऐ, ओ—औ ह्या सजातीय स्वरांच्या ५ जोड्या होत. भिन्न स्थानांतून उच्चारल्या जाणार्‍या स्वरांना विजातीय स्वर म्हणतात. अ—इ, ई—उ, ऊ—ए, ऐ—ओ अशा कितीतरी विजातीय जोड्या तयार होतील.

उप+आहार= उपाहार (=थोडा फराळ) (उपहार×), रवि+इंद्र= रवींद्र (रविंद्र×) ह्यांसारखे ‘दीर्घत्व संधी’ होऊन होणारे शब्द; हृषीक+ईश= हृषीकेश (ऋषिकेश×) (हृषीक= ज्ञानेंद्रिय, ऋषिक= हीन दर्जाचा ऋषी), अल्प+उप+आहार= अल्पोपाहार (अल्पोपहार×) ह्यांसारखे ‘गुणादेश’ होऊन होणारे शब्द; कोटि+अवधि= कोट्यवधि(धी) (कोट्यावधी×), कोटि+अधि+ईश= कोट्यधीश (कोट्याधीश×) ह्यांसारखे ‘यणादेश’ होऊन होणारे शब्द; हे संधिप्रकार शिकताना सजातीय स्वर आणि विजातीय स्वर माहिती असणे आवश्यक असते.

— वर्गीय व्यंजने आणि अ-वर्गीय व्यंजने —

एकूण ३४ व्यंजनांपैकी क् ते म् ह्या पहिल्या २५ व्यंजनांना वर्गीय व्यंजने म्हणतात. ह्या २५ व्यंजनांचे ‘क्, च्, ट्, त्, प्’ असे ५ वर्ग केलेले असून प्रत्येक वर्गात क्रमाने ५ व्यंजने घेतली आहेत. प्रत्येक वर्गातील ५ व्यंजनांना प्रत्येकी १ ते ५ असे क्रमांकही दिलेले आहेत. य् ते ळ् ह्या उरलेल्या ९ व्यंजनांना अवर्गीय व्यंजने म्हणतात.

दिग्+पाल= दिक्पाल, आपद्+काल= आपत्काल ह्यांसारखे ‘प्रथम-व्यंजन संधी’ होऊन होणारे शब्द; जगत्+ईश्वर= जगदीश्वर (जगदिश्वर×), उत्+ध्वस्त= उद्ध्वस्त (उध्वस्त×) ह्यांसारखे ‘तृतीय-व्यंजन संधी’ होऊन होणारे शब्द; दिक्/दिग्+मूढ= दिङ्मूढ, वाक्/वाग्+निश्चय= वाङ्निश्चय ह्यांसारखे ‘अनुनासिक संधी’ होऊन होणारे शब्द; भयम्+कर= भयंकर, सम्+रक्षण= संरक्षण ह्यांसारखे ‘म—चे संधी’ होऊन होणारे शब्द; हे संधिप्रकार शिकताना व्यंजनांचे वर्ग आणि त्यांचा क्रम ह्यांची माहिती असणे आवश्यक असते.

— कठोर व्यंजने आणि मृदू व्यंजने —

आपल्या वर्णमालेतील ३४ व्यंजनांपैकी क्, ख्, च्, छ्, ट्, ठ्, त्, थ्, प्, फ्, श्, ष्, स् ही व्यंजने कठोर आहेत, तर ग्, घ्, ङ्, ज्, झ्, ञ्, ड्, ढ्, ण्, द्, ध्, न्, ब्,भ्, म्, य्, र्, ल्, व्, ह्, ळ् ही व्यंजने मृदू आहेत. छोट्याशा युक्तीने ही विभागणी लक्षात ठेवणे अगदी सोपे जाते.

एखाद्या शब्दात एखादा वर्ण बदलेल का, एखाद्या अक्षराचे द्वित्व होईल का, एखाद्या अक्षराचा आगम होईल का, र्‍हस्व-दीर्घ बदलेल का, विसर्ग येईल की नाही, रफार येईल की नाही; हे ठरवण्यासाठी कठोर आणि मृदू व्यंजनांची माहिती असणे आवश्यक असते. अन्यथा पुनःप्रक्षेपण (पुनर्प्रक्षेपण×), पुनःसादरीकरण (पुनर्सादरीकरण×) अशा चुका अज्ञानाने होऊन जातात.

ए ते झेड ही इंग्लिश भाषेची वर्णमाला पाठ असल्यामुळे इंग्लिश स्पेलिंग्ज बिनचूक लिहायला मदत होत नसूनसुद्धा ती वर्णमाला आपल्याला पाठ असते, परंतु आपल्या मराठी भाषेची वर्णमाला तिच्या वैशिष्ट्यांसह पाठ असेल, तर कितीतरी शब्द बिनचूक लिहायला मदत होत असूनसुद्धा ही वर्णमाला आपल्याला पाठ नसते. परिणामी, परीक्षेत व्याकरण विभागातील गुण आपण गमावून बसतो आणि पुढील आयुष्यात अशुद्धलेखनाची रूढी तयार करणार्‍यांमध्ये सामील होतो. पाठ्यपुस्तकांमध्ये पाठाच्या शेवटी दिल्या जाणार्‍या व्याकरणात ह्या बाबींची माहिती एवढी तोकडी दिलेली असते की, त्यावरून अध्ययन किंवा अध्यापन केल्यावर त्या-त्या बाबीची मूलभूत संकल्पनासुद्धा विद्यार्थ्यांना स्पष्ट होऊ शकत नाही. पुस्तकाची पृष्ठसंख्या कमी पडत असेल, तर दोन धडे आणि दोन कविता कमी घातल्या तरी चालतील. कारण धडे आणि कविता ह्यांखालची प्रश्नोत्तरे, तीही बहुधा मार्गदर्शकातून तोंडपाठ केलेली, देता आली म्हणजे भाषा आली, असे नाहीच मुळी. शुद्धलेखनाच्या दृष्टिकोनातून आपल्या वर्णमालेचे महत्त्व शिकवले आणि पटवले जात नाही. हे महत्त्व दाखवून आणि पटवून देणे हाच ह्या लेखाचा उद्देश आहे.

अरुण फडके, संपादक : मराठी लेखन-कोश


← Previous Post Next Post