शुद्धलेखनाचे सुलभीकरण

माझे विचार

लेखक अरुण फडके, दिनांक January 01, 2011 · 41 mins read

शुद्धलेखनाचे सुलभीकरण

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने 1962 साली केलेले 14 आणि 1972 साली केलेले 4 असे मराठी शुद्धलेखनाचे एकूण 18 नियम तेव्हापासून आत्तापर्यंत प्रचलित आहेत. ह्या नियमांमध्ये तेव्हापासूनच काही विसंगती आणि काही त्रुटी राहून गेल्या होत्या. परंतु त्यांसंबंधीची नाराजी सध्या वारंवार पुढे येऊ लागल्यामुळे आता महामंडळाने ह्या नियमांचे सुलभीकरण करण्यासाठी काही पावले उचलायला सुरुवात केली आहे. ह्यासंबंधात झालेल्या चर्चासत्रांमध्ये मी माझे विचार किंवा माझे पर्यायी नियम मांडले आहेतच. त्याच निबंधात थोडी सुधारणा करून ते आज मी मराठी वाचकांसमोर खुल्या चर्चेसाठी ठेवत आहे. ‘शुद्धलेखनाचे नियम’ हा लोकशाही मार्गाने सोडवण्याचा प्रश्न नसला, तरी अंतिम समितीने अंतिम निर्णय घेण्यापूर्वी त्या समितीसमोर अधिकाधिक अभ्यासकांची मते आली पाहिजेत, असे मला वाटते. त्यामुळे समिती जे नियम ठरवेल, ते पक्के करण्याआधी सर्वसाधारण जनतेसमोर प्रसिद्ध करावेत असे मला वाटते. माझ्या मुद्द्यांचा नीट संदर्भ लागावा म्हणून महामंडळाचे प्रचलित नियम शेवटच्या दोन पानांवर दिले आहेत. एका नियमाचे सर्व पोटनियम महामंडळाने एकाच नियमात घातलेले असल्याने सोयीसाठी मी पोटनियमांना उपक्रमांक घातले आहेत.

सुधारित नियम करण्यासाठी मी केलेली निरीक्षणे आणि त्या निरीक्षणांनुसार मी ठरवलेली धोरणे हे माझ्या नियमांचे अधिष्ठान असल्यामुळे, माझे नियम सांगण्यापूर्वी ते अधिष्ठान सांगतो. इथे मी मांडलेल्या कोणत्याही नियमावर आक्षेप नोंदवण्यापूर्वी माझी ही निरीक्षणे आणि धोरणे पुन्हा एकदा पाहावीत, अशी माझी विनंती आहे.

निरीक्षणे आणि धोरणे

नियम क्र.5, हा ऱ्हस्व-दीर्घाचा पहिलाच नियम करताना तो ‘मराठीची प्रकृती’ पाहून केला गेल्याचा उल्लेख महामंडळाच्या ह्या नियमात आहे. मात्र पुढे; सामासिक शब्द, साधित शब्द, शब्दातील उपान्त्य इकार व उकार, अनुस्वारयुक्त इकार व उकार, जोडाक्षरापूर्वीचे इकार व उकार, सामान्यरूपे ह्यांसंबंधीचे नियम करताना ‘मराठीच्या प्रकृतीचा दृष्टिकोण’ पूर्णपणे डावलला गेला आहे. सद्यःस्थितीत हे नियम बहुसंख्य लोकांना असमाधानकारक वाटण्याचे आणि लेखनात चुका होण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. गेल्या बारा वर्षांत मी मराठी शुद्धलेखनाचे सुमारे 200 वर्ग महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्तरांतील विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि प्राध्यापकांसाठीही घेतले. त्यांतील प्रत्येक वर्गात नियमांमधील ह्याच बाबी; शिकवताना मला, आणि शिकताना प्रशिक्षणार्थींना; त्रासदायक वाटत होत्या, हे मी निश्चितपणाने सांगू शकतो. मराठीच्या नियमानुसार न चालणारा संस्कृत शब्द ‘संस्कृतमधून मराठीत आला आहे, हे ओळखायचे कसे’ ह्या प्रश्नाला आपल्याकडे काहीही उत्तर नाही. हे ओळखता न येणे, आणि तरीही तो मराठी शब्दाच्या लेखनापेक्षा वेगळ्या पद्धतीने लिहावा लागणे, हीच ह्या सर्वांमधील प्रमुख आणि प्रामाणिक अडचण आहे. पहिल्या नियमाप्रमाणेच इतर सर्व नियमांमध्येही ‘मराठीची प्रकृती’ तेव्हाच पाहिली गेली असती, तर प्रचलित नियम आज एवढे गैरसोईचे ठरले असते, असे मला वाटत नाही. त्यामुळे ‘मराठी शुद्धलेखनाचे नियम मराठीच्या लेखनप्रकृतीप्रमाणे असावेत’ हे मुख्य धोरण ठेवून मी प्रचलित नियमांना पर्यायी नियम देणार आहे.

लेखन किंवा लेखनाचे नियम उच्चारानुसारी असावेत, असे मला अजिबात वाटत नाही. किंबहुना तसे करणे मला योग्य आणि शक्य वाटत नाही. ह्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत-

1)आपण आपल्या मुखावाटे जेवढे ध्वनी काढू शकतो, त्या प्रत्येक ध्वनीसाठी एक स्वतंत्र लेखनचिन्ह उपलब्ध असणारी समृद्ध लिपी ज्या भाषेची आहे, त्याच भाषेत ‘उच्चारानुसारी लेखनाचे नियम’ ही गोष्ट शक्य आहे. एवढी समृद्ध लिपी असलेली भाषा जगात आहे का, असा प्रश्नही मला पडला आहे. आपल्या भाषेची लिपी एवढी समृद्ध नसल्यामुळे ‘उच्चारानुसारी लेखनाचे नियम’ ही गोष्ट आपल्या भाषेत मला शक्य आणि योग्य वाटत नाही. अनुस्वारयुक्त अक्षरानंतर ‘य ते ज्ञ’ ह्यांपैकी एखादा वर्ण आल्यास, अशा शब्दाचा उच्चार करताना, अनुस्वारयुक्त अक्षरानंतर ‘य्‌, व्‌, ल्‌’ ह्या वर्णांचा उच्चार स्पष्ट ऐकायला येतो. उदाहरणार्थ- संयम, संरक्षण, संलग्न, सिंह, संज्ञा. परंतु ह्याला ‘श्रुती होणे’ असे म्हटले जाते, आणि ह्या वर्णांचे लेखन आपण करत नाही. ‘तत्त्व, महत्त्व; उज्ज्वल, उज्ज्वला’ अशा काही शब्दांमध्ये ‘त्‌ आणि ज्‌’ ह्या वर्णांचे द्वित्व लेखनात येत असले, तरी ते उच्चारात स्पष्टपणे आणता येत नाही. ‘काव्याने = कवितेने; काव्याने = हुलकावणी देऊन’ त्याचप्रमाणे ‘पुण्याने = चांगल्या कृत्याने; पुण्याने = पुणे या शहराने’ अशा शब्दांमधील सघात आणि निराघात उच्चारभेद आपण लेखनात दाखवू शकत नाही. ‘सख्खा, विठ्ठल, बथ्थड, लफ्फा’ ह्या शब्दांचे प्रत्यक्ष उच्चार मात्र ‘सक्खा, विट्ठल, बत्थड, लप्फा’ असे होतात. ‘सुरुवात, गुरुवार’ अशा काही शब्दांमध्ये शब्दात असलेल्या उकाराचा उच्चारात लोप होतो, तर ‘खवचट, गवताळ, चवदार, टवटवीत, नवखा, लवकर, लवथवती’ अशा काही शब्दांमध्ये नसलेला औकार उच्चारात मात्र ऐकायला येतो. ‘सतरा, बकरा, नोकरी, भाकरी, डमरू, ठाकरे, लेकरे’ हे सारे शब्द जोडाक्षरविरहित असूनही ह्या शब्दांमध्ये र-युक्त जोडाक्षराचा उच्चार ऐकायला येतो, तर ‘कातरी, खातरी, भितरा, सरदी, सररास, निवळ’ हे शब्द असेच बरोबर असून ते जोडाक्षरयुक्त नाहीत, हे सांगितल्यावर ते अनेकांना पटणार नाही, असे त्यांचे उच्चार जोडाक्षरयुक्तच आहेत. ही सारी उदाहरणे हेच दाखवतात की, ‘उच्चारानुसारी लेखनाचे नियम’ असे करण्याइतकी आपल्या भाषेची लिपी समृद्ध नाही, आणि आपल्या उच्चारणातही हे भिन्नत्व दाखवण्याइतकी स्पष्टता नाही.

2) अगदी ऱ्हस्व-दीर्घाच्या बाबतीतही, काही मोजके शब्द सोडले, तर बोलण्याच्या सहज ओघात आणि सहज वेगात इकार आणि उकार ह्यांतील ऱ्हस्व-दीर्घाचा फरक सहज ओळखता येत नाही आणि तसा तो दाखवताही येत नाही. त्यासाठी तो उच्चार मुद्दाम लांबवून किंवा आखूड करून बोलावे लागते, जे सहज बोलणे नसते.

3)‘कोणाचे आणि कोणते उच्चार प्रमाण मानायचे’ ह्याचा निर्णय करणे ही गोष्ट आज वाटते तेवढी सहजशक्य राहिलेली नाही.

4)‘उच्चारशास्त्र’ आणि ‘उच्चारकोश’ ह्या विषयांवर मराठीत सविस्तर ग्रंथ उपलब्ध नाहीत. त्यामुळे उच्चारांच्या बाबतीत आलेली अडचण सोडवण्यासाठी मराठीत पुरेसे संदर्भ उपलब्ध नाहीत.

5)महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या व्यक्तींचे वेगवेगळे उच्चार ध्वनिमुद्रित करून घेऊन त्यांच्या अभ्यासपूर्ण निरीक्षणाने काही निष्कर्ष काढण्याचे शास्त्रशुद्ध काम महाराष्ट्रात आजपर्यंत झालेले नाही.

6)आपल्या सर्व मुळाक्षरांचे योग्य उच्चार कसे करायचे, विशेषतः ‘ऋ, ङ, ञ, ण-न, श-ष, क्ष’ ह्या अक्षरांचे उच्चार कसे करायचे, हे प्राथमिक शिक्षणही आपण कोणत्याही इयत्तेत धडपणाने देत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

7)‘लेखन करताना लेखनाचे नियम पाळावेत, आणि बोलताना बोलण्याच्या पद्धती पाळाव्यात’ हे धोरण मला अधिक योग्य वाटते; आणि माझ्या मते बहुसंख्य किंवा सर्वच प्रगत भाषा ह्याच धोरणाने चालत असाव्यात. मला माहीत असलेल्या इंग्लिश आणि जर्मन ह्या भाषांमध्ये तरी हेच धोरण दिसते.

8)उच्चार आणि लेखन ह्यांमधील फरक शब्दकोशात कंसांत दाखवता येतो.

प्रगत किंवा प्रगतिशील अशा प्रत्येक भाषेला स्वतःची अशी एक लेखनप्रकृती असते, आणि त्या प्रकृतीला धरूनच ती भाषा वेगात प्रगती करू शकते. ‘इतर भाषांमधून शब्द घेणे’ हे काम इंग्लिश भाषेकडूनही अव्याहत चालू असते, पण ते तिच्या स्वतःच्या प्रकृतीला धरूनच केले जाते, हे आपण सारेच जण पाहत आहोत.

व्युत्पत्ती आणि लेखनप्रकृती ह्या दोन भिन्न आणि स्वतंत्र गोष्टी आहेत. एखाद्या शब्दाची निर्मिती, त्याची बदलत गेलेली रूपे आणि त्याचा अर्थ किंवा त्याचे अर्थ यांचे मूळ आणि त्यांचा इतिहास, ह्या गोष्टी व्युत्पत्ती सांगते; तर विशिष्ट भाषेत तो शब्द कसा लिहावा, हे त्या भाषेची प्रकृती सांगते. इंग्लिश शब्दकोशांमध्ये शब्दानंतर किंवा शब्दार्थांनंतर कंसांत दिलेली माहिती आणि त्या शब्दाचे प्रत्यक्ष स्पेलिंग ह्या गोष्टी आपल्याला हेच तर सांगतात. ब्रिटिश इंग्लिशमधील कित्येक स्पेलिंग्ज उत्तर अमेरिकी इंग्लिशमध्ये त्या भाषेच्या प्रकृतीप्रमाणे बदलून घेतली जात आहेत, हे तर आपण पाहतच आहोत.

‘शास्त्रापेक्षा रूढी श्रेष्ठ’ ही उक्ती खरंच योग्य आहे का? ‘अनास्था, अज्ञान आणि अंधानुकरण’ ही जर रूढी पडण्यामागची कारणे असतील, तर ती रूढी योग्य मानायची का? ‘मान-अपमान, उपकार, वाद नको म्हणून तडजोड’ अशा बाबींचा अंतर्भाव असलेल्या आजच्या शुद्धलेखन-नियमांना ‘शास्त्र’ म्हणता येईल का?

‘आधुनिक मराठी गद्याचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे विष्णुशास्त्री चिपळूणकर ह्यांनी त्यांच्या ‘निबंधमाला’ ह्या मासिकातील ‘लेखनशुद्धी’ ह्या लेखात शास्त्र आणि रूढी ह्यांविषयी पुढीलप्रमाणे म्हटले आहे- ‘शास्त्र म्हणजे तत्त्ववेत्त्या पुरुषांनी चांगला विचार करून घालून दिलेले नियम; आणि रूढी म्हणजे कालगत्या पडलेला प्रचार.’

मला संस्कृत भाषेचा द्वेष करायचा नाही, तर त्या भाषेतील काही शब्दांमुळे मराठीच्या लेखनात निर्माण होणारी विसंगती दूर व्हावी, एवढाच माझा हेतू आहे. संस्कृतसह इतर कोणत्याही भाषेतून मराठीत येणाऱ्या कोणत्याही शब्दाची त्या-त्या भाषेतील व्युत्पत्ती तशीच राहील. मात्र त्याचे मराठीत आगमन होताना त्याचे लेखन मराठीच्या लेखनप्रकृतीनुसार केले जाईल एवढेच.

एवढी प्रस्तावना करून, आता शुद्धलेखनाचे सुलभीकरण करण्यासाठी माझे नियम सांगतो. प्रत्येक नियमानंतर त्याची कारणे आणि त्याचे परिणाम हेही सांगणार आहे

.

01) कोणत्याही शब्दातील ज्या अक्षराचा उच्चार नाकातून स्पष्ट आणि खणखणीत होत असेल, अशा प्रत्येक अक्षरावर अनुस्वार द्यावा किंवा असा नासोच्चारयुक्त शब्द पर-सवर्णाने लिहावा लागल्यास अनुस्वारानंतर येणाऱ्या अक्षराच्या वर्गातील अनुनासिकच पर-सवर्ण म्हणून वापरावे. कोणत्याही शब्दातील किंवा त्याच्या कोणत्याही रूपातील अस्पष्टोच्चारित नासोच्चारासाठी शब्दात कुठेही अनुस्वार देऊ नये. त्याचप्रमाणे इतर कोणत्याही कारणासाठी कोणत्याही शब्दात कोठेही अनुस्वार देऊ नये.

(हा नियम, महामंडळाच्या नियम क्रमांक 1.1 ते 1.5, 3.1, 3.2 आणि 4 ह्या नियमांना आपल्या कक्षेत घेतो. ह्या नियमामुळे ‘आम्हां, आम्हांला, तुम्हां, तुम्हांला, आपणांस’ ह्या शब्दांमधील नासोच्चार अस्पष्टोच्चारित असल्यामुळे ही अनेकवचनी आणि आदरार्थी बहुवचनी अशी सर्वनामांची सामान्यरूपे अनुस्वाराशिवाय लिहिली जातील. ह्या रूपांवरूनच ती अनेकवचनी किंवा आदरार्थी बहुवचनी आहेत, हे सहज समजते. असे केल्याने नियम क्रमांक 1 आणि 3 ह्यांमधील विसंगती संपुष्टात येईल. पर-सवर्ण लेखन करण्याची पद्धत अनुस्वारयुक्त अशा काही संस्कृत शब्दांपुरतीच मर्यादित राहणार नाही. अशी मर्यादा असण्याचे कोणतेही भाषाशास्त्रीय कारण मला दिसत नाही. ‘चंगळ, मांजर, बंडल, धांदल, कांबळ’ असे मराठी अनुस्वारयुक्त शब्दही गरजेनुसार ‘चङ्गळ, माञ्जर, बण्डल, धान्दल, काम्बळ’ असे योग्य त्या परसवर्णाने लिहिले तरी चालतील. अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी; उदाहरणार्थ, देहांत = अनेक देहांमध्ये, देहान्त = मृत्यू; अनुस्वार आणि परसवर्ण असा लेखनभेद करण्याची गरज भासणार नाही. ह्यांच्यातील अर्थभेद संदर्भानेही समजू शकतो. मुकुंद (=विष्णू; कृष्ण; पारा; पांढरी कण्हेर), पतंग (=पक्षी; टोळ; पतंग; सूर्य), कांचन (=सोने; संपत्ती; कमलकेसर; काचेचे भांडे) ह्यांसारख्या अनुस्वारयुक्त संस्कृत शब्दांनाही अनेकार्थ आहेत, पण ह्यांचे लेखन मुकुंद/मुकुन्द, पतंग/पतङ्ग, कांचन/काञ्चन असे कसेही केले, तरी त्यांचा योग्य तो अर्थ संदर्भानेच समजतो. मग फक्त वेदांत/वेदान्त, देहांत/देहान्त अशा प्रकारच्या मोजक्या शब्दांच्या अर्थभेदासाठी त्यांमध्ये लेखनभेद ठेवण्याचा नियम असण्याची गरज मला वाटत नाही.)

02) ‘य, र, ल, व, श, ष, स, ह आणि ज्ञ’ ह्यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा.

(महामंडळाच्या नियम क्रमांक 2.1 आणि 2.2 ह्या नियमांना हा एकत्रित पयार्य आहे.)

03) सर्व शब्दांच्या अन्त्य अक्षराचा इकार किंवा उकार दीर्घ लिहावा.

(हा नियम, महामंडळाच्या नियम क्रमांक 5.1 ते 5.4 ह्या नियमांना आपल्या कक्षेत घेतो. अन्त्याक्षर दीर्घ लिहिणे, ही मराठीची प्रकृती असून हीच प्रकृती लक्षात घेऊन महामंडळाने 5.1 हा ऱ्हस्व-दीर्घाचा पहिला नियम केल्याचे ह्या नियमाच्या स्पष्टीकरणात म्हटले आहे. त्यामुळे आता ह्या नव्या नियमामुळे मराठीमधील ‘आणि’ व ‘नि’ ही दोन अव्यये; आणि संस्कृतमधील ‘अति, अद्यापि, इति, कदापि, किंतु, तथापि, परंतु, प्रभृति, यथामति, यथाशक्ति, यद्यपि, संप्रति’ ही बारा अव्यये; हे सारे शब्द दीर्घान्त लिहिले जातील. ही सारी अव्यये आहेत हे मान्य. परंतु अव्यये आहेत म्हणून ती ऱ्हस्वान्त लिहिली पाहिजेत, असे असण्याची कोणतीही नितांत गरज दिसत नाही. प्रत्येक शब्दजात वेगळी कळावी म्हणून आपण त्या-त्या जातीच्या लेखनात काही वैशिष्ट्य आणू शकणार आहोत का? तसे ते आणण्याची गरजही नाही. मग फक्त अव्ययांच्या बाबतीतच हे लेखनवैशिष्ट्य कशासाठी? त्यांच्या व्याकरणिक गुणधर्मांमुळे किंवा वैशिष्ट्यांमुळे ती अव्यये ठरतात, त्यांच्या ऱ्हस्वान्त लिहिण्यामुळे नव्हे. त्यामुळे नियमाला विनाकारण होणारे एवढे 12 अपवाद टाळून नियमात एकवाक्यता आणणे मला योग्य आणि आवश्‍यक वाटते.)

04) सर्व अ-कारान्त शब्दांमधील उपान्त्य अक्षराचा इकार किंवा उकार दीर्घ लिहावा.

(महामंडळाच्या नियम क्रमांक 7.1ला हा पर्यायी नियम आहे. अ-कारान्तापूर्वीचा इकार किंवा उकार दीर्घ लिहिणे, ही मराठीची प्रकृती आहे. सर्व मराठी शब्द आणि ‘दीप, वीर, गूढ, शूर’ असे 125पेक्षा अधिक नित्योपयोगी संस्कृत शब्द सध्या ह्याच नियमानुसार लिहिले जातात. त्यामुळे ‘गणित, हित, गुण, सुख’ असे 250पेक्षा अधिक नित्योपयोगी संस्कृत शब्दसुद्धा ‘गणीत, हीत, गूण, सूख’ असे मराठीच्या प्रकृतीनुसारच लिहिले जातील. नाहीतरी कित्येक संस्कृतप्रेमी व्यक्तीसुद्धा ‘विष, हित, गुण, सुख’ अशा संस्कृत शब्दांचे उच्चार मराठीतील ‘खीर, खूण’ ह्यांप्रमाणेच ‘वीष, हीत, गूण, सूख’ असेच करताना आढळतात. ‘उच्चारानुसारी लेखन’ हे धोरण तेव्हा कोणाच्या ध्यानीमनीही नसते.)

05) अन्त्य अक्षरातील स्वर दीर्घ असेल, तर उपान्त्य अक्षराचा इकार किंवा उकार ऱ्हस्व लिहावा.

(महामंडळाच्या नियम क्रमांक 6ला हा पर्यायी नियम आहे. अन्त्य अक्षरातील स्वर दीर्घ असेल, तर उपान्त्य अक्षराचा इकार किंवा उकार ऱ्हस्व लिहिणे, ही मराठीची प्रकृती आहे. सर्व मराठी शब्द आणि ‘कविता, प्रतिमा, तनुजा, बहुधा, अतिथी, भगिनी’ असे 100पेक्षा अधिक नित्योपयोगी संस्कृत शब्द सध्या ह्याच नियमानुसार लिहिले जातात. त्यामुळे ‘क्रीडा, गीता, सीमा, असूया, पूजा, मयूरी’ असे 30पेक्षा अधिक नित्योपयोगी संस्कृत शब्दसुद्धा ‘क्रिडा, गिता, सिमा, असुया, पुजा, मयुरी’ असे लिहिले जातील. त्याचप्रमाणे ‘नीती, प्रीती, भूमी, रूढी’ अशा संस्कृत शब्दांमध्येही 5.1 ह्या प्रचलित नियमानुसार अन्त्य अक्षरातील स्वर दीर्घ होत असल्यामुळे ह्यांतील उपान्त्य अक्षराचा इकार किंवा उकार ऱ्हस्व होईल. अन्यथा महामंडळाचा नियम क्रमांक 5.1 आणि 6 ह्यांच्या एकमेकावर होणाऱ्या कुरघोडीमुळे होणारा गोंधळ ‘समजावून सांगणे आणि समजून घेणे’ फारच कठीण आणि गुंतागुंतीचे होते एवढे निश्चित. ‘गृहिणी, भगिनी, कुपी, विदुषी’ असे मराठीच्या प्रकृतीनुसार चालणारे शब्द संस्कृतमध्ये आहेतच. लागोपाठ दोन दीर्घ इकार किंवा उकार ही गोष्ट जोडशब्दात किंवा सामासिक शब्दातच शक्य होईल, उदाहरणार्थ: थालीपीठ.

06) उपान्त्यपूर्व अक्षराचा इकार किंवा उकार ऱ्हस्व लिहावा.

(महामंडळाने केलेले ऱ्हस्व-दीर्घचे सर्व नियम कोणत्याही शब्दातील केवळ अन्त्य आणि उपान्त्य ह्या दोनच स्थानांवरील ऱ्हस्व-दीर्घ दाखवतात. परंतु उपान्त्यपूर्व अक्षराचा इकार किंवा उकार कसा लिहायचा यासंबंधी महामंडळाने एकही नियम केलेला नसल्याने हा सर्वस्वी नवा नियम करणे गरजेचे आहे. ही उणीव आणि ही गरज द.न. गोखले ह्यांनी त्यांच्या ‘शुद्धलेखन विवेक’मध्येही दाखवली आहे. मी त्याची पूर्तता इथे माझ्या धोरणानुसार करत आहे. उपान्त्यपूर्व अक्षराचा इकार किंवा उकार ऱ्हस्व लिहिणे, ही मराठीची प्रकृती लक्षात घेऊन हा नियम केला आहे. सर्व मराठी शब्द आणि ‘किरण, विशेषण, दिवाकर, सुधारणा’ असे संस्कृत शब्द सध्या ह्याच नियमानुसार लिहिले जातात. त्यामुळे नियमात एकवाक्यता ठेवण्यासाठी ‘जीवन, समीकरण, भूषण’ असे संस्कृत शब्द आता ‘जिवन, समिकरण, भुषण’ असे मराठीच्या प्रकृतीनसुार लिहिले जातील.)

07) अनुस्वारयुक्त इकार किंवा उकार, विसर्गापूर्वीचा इकार किंवा उकार, आणि जोडाक्षरापूर्वीचा इकार किंवा उकार हे कोणत्याही शब्दात कोणत्याही स्थानावर आले, तरी नेहमी ऱ्हस्वच लिहावेत.

(महामंडळाच्या नियम क्रमांक 7.2ला हा पर्यायी नियम आहे. नियमात उल्लेख केलेल्या ठिकाणी येणारे सर्व इकार किंवा उकार ऱ्हस्व लिहिणे, ही मराठीची प्रकृती आहे. सर्व मराठी शब्द आणि ‘चिंतन, कुटुंब, निःशस्त्र, दुःख, चित्र, दुष्ट’ असे 175पेक्षा अधिक नित्योपयोगी संस्कृत शब्द सध्या ह्याच नियमानुसार लिहिले जातात. त्यामुळे ‘रवींद्र, अतींद्रिय, तीव्र, सूक्ष्म’ असे 90पेक्षा अधिक नित्योपयोगी संस्कृत शब्दसुद्धा ‘रविंद्र, अतिंद्रिय, तिव्र, सुक्ष्म’ असे लिहिले जातील. ह्यांतील ‘रवींद्र, अतींद्रिय’ हे शब्द दीर्घत्व संधीने झालेले आहेत, ह्याची जाणीव मला आहे. परंतु ह्या नियमाला हे दोनच शब्द अपवाद ठरत असतील, तर त्यांतील अनुस्वारयुक्त इकार ऱ्हस्व लिहिण्याने काही अनर्थ होतो असे मला वाटत नाही. त्यांचे विग्रह अनुक्रमे ‘रवि+इंद्र आणि अति+इंद्रिय’ असे आहेत, हे कोशात आणि व्याकरणाच्या पुस्तकात दाखवता येईलच.)

08) सामासिक शब्द किंवा जोडशब्द लिहिताना प्रत्येक घटक शब्दाचे लेखन संबंधित नियमानुसार करावे.

(हा नियम, महामंडळाच्या नियम क्रमांक 5.5 आणि 5.6 ह्या नियमांना आपल्या कक्षेत घेतो. मराठीतील सामासिक शब्द पाहिल्यावर समासातील प्रथमपदासाठीही मराठीची प्रकृती दीर्घान्तच दिसते. ‘खडीसाखर, वांगीपोहे (तत्पुरुष); दहीभात, भाऊबहीण (द्वंद्व); मातीमोल, वाळूवजा (बहुव्रीही)’; ह्यांसारखे मराठी सामासिक शब्द सध्या ह्याच नियमानुसार लिहिले जातात. त्यामुळे ‘बुद्धिवैभव, अणुशक्ती’ ह्यांसारखे संस्कृत शब्दही ‘बुद्धीवैभव, अणूशक्ती’ असे मराठीच्या प्रकृतीनसुार लिहिले जातील. इथे अगदी ‘उच्चारणानुसार’ विचार करायचे ठरवले, तरी मराठीतील सामासिक शब्द उच्चारताना पहिले पद दीर्घान्त, आणि संस्कृतमधील सामासिक शब्द उच्चारताना (तो संस्कृतमधील आहे हे माहीत नसूनसुद्धा) पहिले पद ऱ्हस्वान्त, असा उच्चारभेद मराठी माणसाकडून आपोआपच होत असतो, हे सिद्ध करता येईल का?) (‘उपान्त्यपूर्व अक्षराचा इकार किंवा उकार ऱ्हस्व लिहावा’, हा नियम इथे कोणत्याच शब्दाला लागू होणार नाही.)

09) कोणताही शब्द मराठीच्या कोणत्याही कोशात दाखवताना त्याचे लेखन ह्या नियमांप्रमाणेच करावे.

(महामंडळाच्या नियम क्रमांक 5.7ला हा पर्यायी नियम आहे. ऱ्हस्व-दीर्घच्या नियमांतील हा नियम म्हणजे गोंधळाचा कहर आहे. मुळात नियम गुंतागुंतीचे करायचे, त्यात ते कधीही शिकवायचे नाहीत, मग अडलेला माणूस साहजिक कोश बघणारच. कोशात त्याला हे शब्द ऱ्हस्वान्त सापडतील, आणि मग नियमांच्या अज्ञानामुळे तो कोशात पाहून ते आपोआप ऱ्हस्वान्त लिहील, अशी ही सारी परिस्थिती. जणू काही मराठीवर संस्कृतचा पगडा राहिलाच पाहिजे, हा हेतू मनात धरून मखलाशीने ही परिस्थिती तयार केली आहे, असे वाटावे, असा हा सारा गोंधळ आहे. हा गोंधळ दूर करण्यासाठीच हा नवा नियम करावा लागत आहे.)

10) उपान्त्य अक्षराचा दीर्घ इकार किंवा दीर्घ उकार सामान्यरूपात ऱ्हस्व लिहावा.

(महामंडळाच्या नियम क्रमांक 8.1ला हा पर्यायी नियम आहे. उपान्त्य अक्षराचा दीर्घ इकार किंवा दीर्घ उकार सामान्यरूपात ऱ्हस्व करणे, ही मराठीची प्रकृती आहे. त्यामुळे ‘वीर, पूजा, गीत’ ह्यांसारख्या संस्कृत शब्दांची सामान्यरूपेही ‘विराला, पुजेत, गितासाठी’ अशी लिहिली जातील. ‘कुटुंबीयांना’ हा शब्द अनेक वेळा ‘कुटुंबियांना’ असा लिहिला जातो आणि प्रचलित नियमांनुसार तो चुकीचा ठरतो, हे आपण पाहतोच. त्याशिवाय तो शब्द संस्कृतमधून मराठीत आला आहे हे ओळखायचे कसे हा प्रश्न इथेही आहेच.)

11) संस्कृतसह इतर कोणत्याही भाषेतून मराठीत घेतलेला कोणताही शब्द आणि त्याची वापरावी लागणारी कोणतीही रूपे ह्यांचे लेखन वरील नियमांना अनुसरून करावे. पुनरुक्त आणि नादानुकारी पुनरुक्त शब्दही ह्याच नियमांनुसार लिहावेत.

(हा नियम, महामंडळाचे नियम क्रमांक 14.2 आणि 11 ह्या नियमांना आपल्या कक्षेत घेतो. महामंडळाचा नियम क्रमांक 14.2 हा एक अजब नियम आहे.अन्य भाषेतील शब्दाचे लेखन त्या भाषेतल्या उच्चाराप्रमाणे करणे, ही गोष्ट जवळपास अशक्य आहे, कारण-

1) मुळात तो शब्द मराठी नसून अन्य भाषेतून मराठीत आला आहे, हे सहज ओळखणे, अशा सर्व शब्दांच्या बाबतीत शक्य आहे का?

2) त्यातून, तो कोणत्या भाषेतून आला आहे, हे कळल्यानंतरही त्या भाषेत तो कसा उच्चारला जातो ह्याची शास्त्रशुद्ध माहिती कुठून आणि कशी मिळवायची? जी गोष्ट भाषेच्या अभ्यासकांनाही सहज शक्य होणार नाही, ती सर्वसामान्य माणसाने कशी पाळायची? हा गोंधळ टाळण्यासाठी हा नवा नियम आवश्‍यक असून ह्यामुळे ‘काश्‍मीर, मुस्लीम, हकिकत, ब्रिटीश, हाऊस, टाईम, पाईप, इंजीन, पोलीस, अमिबा’ ह्यांसारखे परभाषांमधून घेतलेले शब्द त्यांच्या मूळ रूपात असे लिहिले जातील; तर त्यांचे सामान्यरूप झाल्यावर ते ‘काश्‍मिरात, मुस्लिमांना, ब्रिटिशांनी, हाऊसमध्ये, इंजिनात, पोलिसाने’, असे लिहिले जातील.

‘चुटपुट, मिणमिण, लुडबुड, हुरहुर’ ह्यांसारखे काही शब्द ‘नादानुकारी’ मानायचे का, ह्यावर वाद होऊ शकतो. त्यामुळे असे शब्द ‘चुटपूट, मिणमीण, लुडबूड, हुरहूर’ असे नियम क्र.7प्रमाणे लिहिले, तरी ते बरोबर धरावे लागतात. ‘भुरुभुरु’ हा शब्द जळणाचा आवाज म्हणून घेऊ, तेव्हा नादानुकारी ठरतो, परंतु उडणाऱ्या केसांसाठी वापरू, तेव्हा नादानुकारी ठरत नाही. मग तो संदर्भाप्रमाणे ‘भुरुभुरु’ (महामंडळाचा नियम क्र.11), आणि ‘भुरुभुरू’ (महामंडळाचे नियम क्र.5 आणि 6), असा दोन्ही पद्धतींनी लिहिलेला चालेल का? पण नियमात तर म्हटले आहे की, असे शब्द ‘उच्चाराप्रमाणे’ ऱ्हस्व लिहावेत. ‘भुरुभुरु’चा उच्चार तर दोन्ही वेळा सारखाच होतो. मग लेखनात फरक करायचा की उच्चारात फरक करायचा?

असा हा गोंधळात टाकणारा आणि वादग्रस्त ठरणारा नियम पूर्णपणे बाद करून टाकावा, आणि ह्या शब्दांच्या अर्थांचा आणि उच्चारांचा संदर्भ न घेता, ते मराठीच्या लेखनप्रकृतीनुसार लिहावेत.)

12) चा-कारान्त, जा-कारान्त आणि झा-कारान्त अशा सर्व आ-कारान्त पुल्लिंगी शब्दांची सामान्यरूपे अनुक्रमे च्या-कारान्त, ज्या-कारान्त आणि झ्या-कारान्त, अशी या-कारान्त करावीत.

(महामंडळाच्या नियम क्रमांक 8.5ला हा पर्यायी नियम आहे. आ-कारान्त पुल्लिंगी शब्दाचे सामान्यरूप या-कारान्त होते, उदा.- घोडा- घोड्याला, दोरा- दोऱ्याने; अशी मराठीची पद्धत असूनही ‘जा’चा ‘ज्या’ का करायचा नाही ते मात्र इथे सांगितलेले नाही. त्याचे कारण बहुधा असे असावे- ‘ज’ ह्या अक्षराला मराठीत दोन उच्चार आहेत. ‘जग’मधील ‘ज’ तालव्य आहे, तर ‘जर’मधील ‘ज’ दंततालव्य आहे. ‘मोजा, सांजा’ अशा शब्दांमधील शेवटचा ‘जा’ दंततालव्य आहे, परंतु ‘मोजाला, सांजात’ अशी ह्या शब्दांची सामान्यरूपे झाल्यावर त्यांतील ‘जा’ तालव्य होतो. सामान्यरूप म्हणजे शब्दाच्या रूपात होणारा विकार. ह्या शब्दांमध्ये लिखित विकार काहीच होत नसला, तरी ह्यांच्या उच्चारात होणारा विकार हेच ह्यांचे सामान्यरूप मानले आहे. म्हणून त्या विकारित तालव्य ‘जा’चा पुन्हा ‘ज्या’ करण्याची गरज नाही. परंतु हे विवेचन मराठीच्या सामान्यरूपाच्या पद्धतीत बसत नाही आणि म्हणून ते पटतही नाही. कसे ते पाहा-

‘आजा, पणजा, मोजा, राजा, सांजा’ ह्या शब्दांमधील ‘जा’ दंततालव्य आहे आणि सामान्यरूपांमध्ये तो तालव्य होतो हे मान्य (‘दरवजा’चा उच्चार वादग्रस्त आहे); परंतु ‘खाजा, खोजा, गमजा, गांजा, दर्जा, पंजा, बाजा, बोजा, मांजा, मुंजा’ ह्या शब्दांमधील ‘जा’ मुळातच तालव्य आहे. सामान्यरूपांमध्येही तो तालव्यच राहतो. मग ह्यांचे सामान्यरूप ‘ज्या-कारान्त केले नाही, तर मग आ-कारान्त शब्दांच्या सामान्यरूपाच्या नियमानुसार ह्यांचे सामान्यरूप झालेच नाही असे होते. नियमांमध्ये मोडणाऱ्या शब्दांच्या संख्येपेक्षा नियमाबाहेर असलेल्या शब्दांची संख्या जास्त, असे काहीतरी उलटेच होत आहे.

‘च, ज, झ’ ह्या तीन अक्षरांना मराठीत प्रत्येकी दोन उच्चार आहेत. ‘चहा, जग, झकास’ ह्यांमध्ये तालव्य उच्चार आहे, तर ‘चल, जर, झबले’ ह्यांमध्ये दंततालव्य उच्चार आहे. असेच दोन उच्चार ‘चा, जा, झा’ ह्यांनाही आहेत. आता मराठीतील चा-कारान्त पुल्लिंगी शब्द पाहू. ‘काचा (वस्त्राचा), कपचा, चमचा, ठेचा, ढाचा, पोचा, भाचा, वेचा (उतारा), साचा, हातचा (गणितातला)’; ह्या सर्व शब्दांमधील अन्त्य ‘चा’ दंततालव्य उच्चारला जातो, तर ‘गालिचा, टोचा (हत्यार)’ ह्या शब्दांतील अन्त्य ‘चा’ तालव्य उच्चारला जातो. अन्त्य ‘चा’ कसाही उच्चारला जात असला, तरी सर्वांची सामान्यरूपे मात्र च्या-कारान्त केली जातात. सर्व नामांची आणि सर्वनामांची षष्ठीची रूपेही च्या-कारान्तच केली जातात. झा-कारान्त पुल्लिंगी शब्द मराठीत बहुधा नाहीत. परंतु ‘मी’ ह्या सर्वनामाचे षष्ठीचे रूप ‘माझ्या’ असे झ्या-कारान्तच केले जाते. मग फक्त जा-कारान्त पुल्लिंगी शब्दाचे सामान्यरूप ज्या-कारान्त न करण्याचे कारण काय? ‘मोर्चा’ ह्या शब्दाचे सामान्यरूपही ‘मोर्च्यात’ असे च्या-कारान्त करावे.)

13) ए-कारान्त नपुंसकलिंगी नामांची सामान्यरूपे या-कारान्त करावीत, परंतु ए-कारान्त आडनावांची सामान्यरूपे तृतीय पुरुष एकवचनात करावी लागतील, तेव्हा ती मात्र ए-कारान्तच ठेवावीत. उदाहरणार्थ- दामलेला, गोखलेची, वाळंबेचे, फडकेने. अशा वेळी या-कारान्त सामान्यरूपे केल्यास ती अपमानकारक ठरतात. उदाहरणार्थ- दामल्याला, गोखल्याची, वाळंब्याचे, फडक्याने.

(महामंडळाच्या नियम क्रमांक 12ला हा पर्यायी नियम आहे. ‘तळे, नाणे’ अशा ए-कारान्त नपुंसकलिंगी नामांची सामान्यरूपे ज्याप्रमाणे ‘तळ्याचे, नाण्यासाठी’ अशी या-कारान्त केली जातात, त्याप्रमाणेच ‘करणे, देणे, नेणे, येणे’ ह्यांसारख्या धातुसाधित ए-कारान्त नपुंसकलिंगी नामांची सामान्यरूपेही ‘करण्याचे, देण्यासाठी, नेण्याची, येण्यामुळे’ अशी या-कारान्तच करावीत. ही रूपे ‘करणेचे, देणेसाठी, नेणेची, येणेमुळे’ अशी ए-कारान्त करू नयेत. मात्र तृतीय पुरुष एकवचनात बोलताना किंवा लिहितानाही, म्हणजेच एक मित्र दुसऱ्या मित्राला एकेरीत संबोधतो तेव्हाही, ‘गोखले, दामले, फडके, वाळंबे’ अशा ए-कारान्त आडनावांची सामान्यरूपे ‘गोखलेने, दामलेशी, फडकेला, वाळंबेचा’ अशी ए-कारान्तच करणे शिष्टाचाराला अनुसरून योग्य ठरते. ह्याबद्दलचे स्पष्टीकरण डॉ. द.न. गोखले ह्यांनी त्यांच्या ‘शुद्धलेखन विवेक’मध्ये पुढीलप्रमाणे दिले आहे - “गोखल्याने, दामल्याशी, फडक्याला, वाळंब्याचा; असे बोलणे रासवट, आडदांड किंवा हलके समजतात. त्यामुळे गोखलेने, दामलेशी, फडकेला, वाळंबेचा अशी सामान्यरूपे विशिष्ट संदर्भात शुद्ध समजावीत.”)

14) कोणत्याही प्रकारच्या मराठी लेखनात ग्रांथिक किंवा बोली ह्यांपैकी एकाच भाषेचा वापर करावा. मात्र ग्रांथिक भाषेत लेखन करताना मध्ये येणारे संवाद बोली भाषेत लिहावेत. एरवी ह्या दोन भाषांचे स्वैर मिश्रण वर्ज्य समजावे. ग्रांथिक भाषेत लिहिताना मात्रायुक्त लेखन करावे (निळे, चांदणे, किरणे, झाडे, सारे, वाड्याचे, होते), तर बोली भाषेत लिहिताना शीर्षबिंदूयुक्त लेखन करावे (निळं, चांदणं, किरणं, झाडं, सारं, वाड्याचं, होतं). मात्र बोली भाषेतील शीर्षबिंदूयुक्त लेखन करताना ‘इकडे, इकडेतिकडे, इथे, -कडे (प्रत्यय), कुठे, जिकडे, जिकडेतिकडे, जिथे, तिकडे, तिथे, त्यामुळे, -पणे (प्रत्यय), पुढे, -प्रमाणे (प्रत्यय), मागे’ हे शब्द बोली म्हणजे शीर्षबिंदूयुक्त, किंवा ग्रांथिक म्हणजे मात्रायुक्त अशा दोन्ही पद्धतींनी लिहिलेले चालतील. उदाहरणार्थ - ‘तुझं नाणं तिकडे (तिकडं) पडलं होतं. त्यामुळे (त्यामुळं) त्याचं पुढे (पुढं) जाणं थांबलं.’ त्याचप्रमाणे ग्रांथिक भाषेतील -ने हा प्रत्यय बोली भााषेत -नी असा वापरला जातो. त्यामुळे तो तसा वापरण्यास हरकत नाही. उदाहरणार्थ- रमेशनीच तुला तिकडे पाठवलं. मात्र इतर बाबतींत ग्रांथिक आणि बोली ह्या दोन लेखनपद्धतींचे स्वैर मिश्रण कुठेही करू नये.

(महामंडळाच्या नियम क्रमांक 13ला हा पर्यायी नियम आहे. नियमात दाखवलेले ग्रांथिक रूपातील शब्द बोली भाषेतही त्यांच्या ग्रांथिक रूपातच वापरणारा फार मोठा मराठी वर्ग आजही दिसतो. ह्या रूपांमध्ये कोणत्याही प्रकारची भाषाशास्त्रीय अयोग्यता नसल्यामुळे आणि हा भाषेचा सहज वापर असल्यामुळे ह्याला ग्रांथिक आणि बोली भाषांचे स्वैर मिश्रण म्हणता येणार नाही.)

15) ‘नाह, पाह, राह, वाह, साह’ अशा प्रकारच्या ह-कारान्त धातूंची रूपे करताना त्यांच्या सर्व रूपांमध्ये पहिले अक्षर आ-कारान्तच राहील, कारण मूळ धातूत ते तसेच आहे. ह-ला येणारा काना गरजेप्रमाणे येईल. उदाहरणार्थ - पाहतो, पाहते, पाहतेस, पाहता, पाहतात, पाहायला, पाहावा(त), पाहावी(त), पहावे(त), पाहाव्या(त). आज्ञार्थी रूपांमध्येही ‘नाहा, पाहा, राहा, वाहा, साहा’ अशी दोन्ही अक्षरांना काने असलेली रूपेच वापरावीत. ‘नहा, पहा, रहा, वहा, सहा’ अशी रूपे कुठेही वापरू नयेत.

(महामंडळाच्या नियम क्रमांका 16ला हा पर्यायी नियम आहे. ‘राहणे, पाहणे, वाहणे’ एवढ्या रूपांपुरताच हा नियम मर्यादित असता कामा नये. ‘नाह (नाहणे), साह (साहणे)’ असे आणखीही काही ह-कारान्त धातू असल्यास त्यांचेही नियमन ह्या नियमाद्वारे व्हायला हवे. त्याचप्रमाणे अशा धातूंच्या आज्ञार्थी रूपांसाठी सरसकट ‘रहा, पहा, वहा’ असा विकल्प देणे मला योग्य वाटत नाही. ह्या धातूंची रूपे ‘काढ’ ह्या धातूप्रमाणे चालतात. आज्ञार्थी रूपे करण्याची वेळ येते ती द्वितीय पुरुष एकवचन आणि द्वितीय पुरुष अनेकवचन ह्या ठिकाणी. द्वितीय पुरुष एकवचनाची आज्ञार्थी रूपे धातूंच्या रूपांनसुार ‘तू काढ/राह/पाह/वाह’ अशी होतात. इथे ‘राह, पाह, वाह’ असे वाक्यात म्हणणे जड जाते हे मान्य आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी ‘रहा, पहा, वहा’ हे म्हणायला सोपे असे पर्याय दिले आहेत. परंतु द्वितीय पुरुष अनेकवचनाची आज्ञार्थी रूपे धातूंच्या रूपांनुसार मुळातच ‘तुम्ही काढा/राहा/पाहा/वाहा’ अशीच होतात. आता ‘राहा, पाहा, वाहा’ असे वाक्यात म्हणणे जड जात नाही. त्यामुळे ‘रहा, पहा, वहा’ हे पर्याय फक्त द्वितीय पुरुष एकवचनापुरतेच मर्यादित केले पाहिजेत. त्याही पुढे जाऊन मी असे म्हणेन की, ‘आज्ञार्थी प्रयोग करताना मात्र ‘राहा, पाहा, वाहा’ अशीच रूपे वापरावीत’ असाच नियम करावा. त्यामुळे पर्यायांचा गोंधळ राहणार नाही आणि मूळ धातूशी विरूप ठरणारी ‘रहा, पहा, वहा’ ही रूपे बाद होतील. ‘राह, पाह, वाह’ असे मूळ धातू असल्यामुळे त्यांच्या कोणत्याही रूपात पहिल्या अक्षराचा आ-कार जाणार नाही.

16) पद्यात वृत्ताचे बंधन पाळताना ऱ्हस्व-दीर्घाच्या बाबतीत गद्यलेखनाचे हे नियम काटेकोरपणे पाळता येणे शक्य नसल्यास कवीला तेवढ्यापुरते स्वातंत्र्य असावे. मात्र अशा वेळी पद्यलेखनात वृत्तासाठी झालेले शब्दलेखनाचे तात्पुरते बदल हे गद्यलेखनासाठी प्रमाण किंवा आधार मानून गद्यलेखनात त्या शब्दांची पद्यरूपे लिहिणे अयोग्य ठरेल. वृत्तमुक्त पद्यलेखन करताना त्यातील ऱ्हस्व-दीर्घाचे लेखन गद्यलेखनासाठी असलेल्या प्रस्तुत नियमांप्रमाणेच करावे.

(महामंडळाच्या नियम क्रमांक 18ला हा पर्यायी नियम आहे. वृत्तबंधन पाळण्यासाठी पद्यलेखनात होणारे बदल प्रमाण मानून गद्यलेखनात ते तसेच वापरले जाऊ नयेत म्हणून हा नियम असा स्पष्ट करणे मला अतिशय गरजेचे वाटते.)

17) हे नियम लागू होण्यापूर्वीच्या कोणत्याही गद्याचे आणि पद्याचे पुनर्मुद्रण करताना ते सद्यःकालीन प्रचलित नियमांनुसार करावे. काही उतारे अवतरण म्हणून घालताना मुळाप्रमाणे घालण्याची पद्धत आज आहे तशीच ठेवावी. त्याचप्रमाणे काही विशिष्ट कारणासाठी एखादे जुने पुस्तक पूर्ण मुळाप्रमाणेच छापायचे असल्यास, तसे करायला हरकत नाही.

(महामंडळाच्या नियम क्रमांक 15ला हा पर्यायी नियम आहे. महामंडळाने हा नियम ‘केशवसुतपूर्वकालीन पद्य आणि विष्णुशास्त्री चिपळूणकरपूर्वकालीन गद्य’ ह्या कालामर्यादेशी निगडित केला आहे. हीच कालमर्यादा का निवडली, ह्याचे कोणतेही स्पष्टीकरण ह्या नियमात दिलेले नाही. पूर्वी छापलेल्या एखाद्या साहित्याचे पुनर्मुद्रण सद्यःकालात कसे करायचे हे ठरवण्यासाठी अशा कोणत्याही कालमर्यादेची आवश्‍यकता असण्याचे कारण नाही. सद्यःकालात ते पुनर्मुद्रण करण्यामागील हेतू महत्त्वाचा ठरतो. तत्कालीन लेखन कसे केले जात होते, एवढेच दाखवायचे असेल, तर एक ऐतिहासिक बाब म्हणून तत्कालीन लेखन मुळाप्रमाणेच छापले पाहिजे. तत्कालीन लेखनातील ज्ञान सद्यःकालीन पिढीला देण्याचा हेतू असेल, तर मात्र नव्या पिढीला कळण्यासाठी ते प्रचलित नियमांनुसार बदलून छापणे आवश्‍यक आहे. अशा वेळी त्या मजकुरातील आशय मुळाप्रमाणे येण्यासाठी अशी मुद्रिते दोन्ही काळांतील लेखनाचे चांगले ज्ञान असलेल्या व्यक्तीकडून अभ्यासपूर्वक तपासून घेणे आवश्‍यक आहे.)

महामंडळाचे नियम क्रमांक 8.2, 8.3, 8.4, 8.6, 8.7, 8.8, 8.9, 9, 10, 14.1 आणि 14.3 हे नियम आहेत तसेच ठेवावेत. मात्र 14.1मध्ये सर्व शब्द स्वरान्त लिहिण्याची मुभा देताना केवळ ‘अन्‌’ हा एकच शब्द व्यंजनान्त लिहिण्याचा अपवाद ठेवला आहे. तोही तसा ठेवण्याची गरज मला वाटत नाही. नियम क्रमांक 17मधील ‘इत्यादी’ आणि ‘ही’ ह्यांची काळजी नियम क्रमांक 5.1मध्ये घेण्यात आली आहे, आणि ‘अन्‌’साठी आता नियमाची गरज नाही. त्यामुळे हा नियम पूर्ण बाद करून टाकावा.

नियम क्रमांक 8.2च्या पूर्वार्धासाठी ‘कावीळ, खोगीर, चाहूल, भाकीत’ असे अपवाद दाखवणे आवश्‍यक आहे, तर ह्या नियमाच्या उत्तरार्धासाठी ‘उशीर, गनीम, फिकीर, विहीर, हुजूर, कारभारीण, पहिलटकरीण, मोलकरीण’ असे अपवाद दाखवणे आवश्‍यक आहे.

नियम क्रमांक 8.3मध्ये ‘ताईत, पाईक’ असे अपवाद दाखवणे आवश्‍यक आहे.

नियम क्रमांक 8.4मध्ये पुढे कोणत्या नामांची ‘श्‍या-कारान्त’ रूपे केव्हा चालतील, हे सांगणेही आवश्‍यक आहे.

नियम क्रमांक 8.6 हा नियम योग्य असला, तरी तो अपूर्ण आहे. सामान्यरूपाच्या वेळी मधल्या अक्षरातील केवळ ‘क’ किंवा ‘प’ ह्यांचेच द्वित्व जाते असे नाही. ‘दिम्मत, शिल्लक’ ह्या शब्दांच्या सामान्यरूपाच्या वेळी मधल्या अक्षरातील ‘म, ल’ ह्यांचेही द्वित्व जाते. ‘मुद्दल, जिन्नस’ ह्या शब्दांचे सामान्यरूप होताना ‘द, न’ ह्यांचे द्वित्व जाते किंवा राहते, असे दिसते. तर ‘अत्तर, चिल्लर’ ह्या शब्दांची सामान्यरूपे होताना मात्र ह्यांतील ‘त, ल’ ह्यांचे द्वित्व तसेच राहते, असे दिसते. ह्या सर्व गोष्टींचा उल्लेख ह्या नियमात होणे आवश्‍यक आहे.

अशा रितीने महामंडळाच्या सर्व 18 नियमांना माझ्या धोरणाप्रमाणे पर्याय दिल्यानंतर त्याशिवाय कोणत्या नव्या नियमांची आवश्‍यकता आहे ते सांगतो.

1) प्रत्ययघटित मराठी शब्दांमधील इकार आणि उकार कसे लिहावेत ह्यासंबंधीचा नियम करावा.

2) महामंडळाचा नियम क्र.8 हा विविध सामान्यरूपे कशी होतात ह्यांसंबंधीचा आहे. परंतु ह्या नियमात महामंडळाने दाखवलेली सर्व सामान्यरूपे ही केवळ ‘वैशिष्ट्यपूर्ण’ सामान्यरूपे आहेत. ‘सर्वसाधारण सामान्यरूपे कशी होतात’ हे लोकांना माहीत आहे, असे गृहीत धरलेले दिसते. असे गृहीत न धरता सर्वसाधारण सामान्यरूपांचे आवश्‍यक तेवढे नियम सोदाहरण आणि स-अपवाद द्यावेत. माझ्या ‘शुद्धलेखन मार्गप्रदीप’मध्ये मी ह्याविषयी सविस्तर विवेचन केले आहे.

3) तृतीयेचा ‘ए’ (मार्ग-मार्गे), पंचमीचा ‘ऊन’ (घर-घरून), आणि सप्तमीची ‘ई’ (घर-घरी) हे विभक्तिप्रत्यय काही अ-कारान्त आणि आ-कारान्त नामांना पररूप संधीने लागतात ह्यासंबंधीचा नियम करावा.

4) स्वीकृत इंग्लिश शब्दांची (स्कूटर, फ्रीझ इत्यादींची) एकवचनी सामान्यरूपे, अनेकवचने आणि अनेकवचनांची सामान्यरूपे कशी करावीत ह्यासंबंधीचा नियम करावा.

5) य-कारान्त मराठी शब्दांची (कोय, गाय, सवय, सोय ह्यांची) उभयवचनी सामान्यरूपे आणि अनेकवचने कशी करावीत ह्यांसंबंधीचा नियम करावा.

6) अभ्यस्त शब्द आणि जोडशब्द ह्यांची (बापलेक, घरदार इत्यादींची) उभयवचनी सामान्यरूपे आणि अनेकवचने कशी करावीत ह्यांसंबंधीचा नियम करावा.

7) आ-कारान्त विशेषणांची (मोठा, चांगला इत्यादींची) सामान्यरूपे आणि त्यांची विशेष्यानुसार बदलणारी रूपे कशी होतात ह्यांसंबंधीचा नियम करावा.

8) अभ्यस्त शब्द आणि जोडशब्द अशा विशेषणांची (उलटासुलटा, वेडावाकडा इत्यादींची) सामान्यरूपे आणि त्यांची विशेष्यानुसार बदलणारी रूपे कशी होतात ह्यांसंबंधीचा नियम करावा.

9) आपल्या सर्व सर्वनामांची सर्व विभक्तिरूपे (सविकरण आणि साधिकरण विभक्तींसह) कशी होतात हे दाखवणारा एक सविस्तर तक्ता देण्याची व्यवस्था करावी. (सविकरण आणि साधिकरण अशा काही विभक्ती असतात, हे आज मराठीच्या कित्येक शिक्षकांना आणि प्राध्यापकांना माहीतही नसेल. कारण आपण कधी शिकवलेच नाही. वापरतो मात्र सररास.)

दंतमूलीय आणि तालव्य ‘च, ज, झ’

आपल्या वर्णमालेतील ‘च, ज, झ’ ह्या वर्णांना ‘चमचा, जहाज, झरा’ अशा शब्दांमध्ये दंतमूलीय उच्चार आहे, तर ‘चहा, जत्रा, झकास’ अशा शब्दांमध्ये तालव्य उच्चार आहे. हे उच्चारभेद दाखवण्यासाठी ह्या वर्णांमध्ये लेखनभेद असावा, असे मला वाटते. कारण उच्चारात भेद आहे, आणि तो दाखवण्याची सोय आपल्याकडे पूर्वी होती. ती तशी ठेवण्यामध्ये गंभीर स्वरूपाच्या अडचणी येत नसतील, तर ती सोय पुन्हा होती तशी आणण्यास काहीच हरकत नाही. ध्वनिचिन्हांच्या बाबतीत आपली लिपी इंग्लिशपेक्षा खूपच सरस असली, तरी उच्चारानुसारी लेखनासाठी ती अपुरी आहे, हेही नाकारता येणार नाही. त्यामुळे ज्यायोगे उच्चारांचे लेखन दाखवण्याची सोय सहजरीत्या करता येईल, असे उपाय वापरण्यास काहीच हरकत नाही. ह्यासाठी पूर्वी वापरले जाणारे उच्चारभेददर्शक चिन्ह पुन्हा वापरात आणण्यास काहीच हरकत नाही. तालव्य उच्चारातील ‘च, ज, झ’ आत्ताप्रमाणेच साधे लिहावेत, आणि दंततालव्य उच्चारातील ‘च, ज, झ’ दाखवण्यासाठी नुक्ता किंवा तलबिंदू वापरावा. अगदी संगणकीय अक्षरजुळणीतसुद्धा हे बदल आणणे सहज शक्य होईल, असे वाटते.

नियमांच्या संख्येला मर्यादा असावी का?

आपल्याला भाषेत वापरावे लागणारे शब्द आणि त्या शब्दांची वापरावी लागणारी विविध रूपे, ह्या सर्वांचे नियमन करतील एवढे आणि असे लेखननियम होणे ही गरजच आहे. त्याशिवाय शुद्धलेखनाच्या नियमांची पूर्तता होऊच शकत नाही. ‘नियमांची संख्या किती’ ही बाब मला महत्त्वाची वाटत नाही. भाषाशास्त्र हा विषयच तेवढा व्यापक असेल, तर नियमांची संख्याही त्यानुसार होणारच की. गणित आणि विज्ञान हे विषय शिकवताना आपण त्यांतील नियमांची मोजदाद कधी करत बसत नाही. मग हे विषय मांडण्याचे माध्यम असलेला भाषा हा विषय शिकवताना आपल्याला त्यातील नियमांच्या संख्येचा प्रश्न का पडावा? मराठी ही आपली मातृभाषा असल्यामुळे काही गोष्टी आपल्याला नकळत माहीत होत असतात, हे मान्य. पण म्हणून ‘ही गोष्ट लोकांना माहीत असल्यामुळे त्याचा नियम करण्याची आवश्‍यकता नाही’, असे म्हणणे अयोग्य ठरेल. गणित आणि विज्ञान ह्या विषयांमध्येही आपण हेच तत्त्व पाळतो. ‘सीता ही रामाची बायको आहे’ ही गोष्ट सर्वांना लहानपणीच कळलेली असते. तरीही संपूर्ण रामायण लिहिताना ही गोष्ट पुन्हा लिहावीच लागते. एखाद्या भाषेचे नियम सांगताना त्यांत पूर्णत्व असलेच पाहिजे.

नव्या सुलभ नियमांमुळे काय होईल, काय होणार नाही?

लेखनाचे नियम असे केल्यानंतर ‘दिन-दीन, सुत-सूत’ असे अर्थभेदयुक्त काही मोजकेच शब्द लेखनदृष्ट्या सारखेच दिसू लागतील, ह्याचीही मला कल्पना आहे. परंतु महामंडळाने जेव्हा मराठीच्या प्रकृतीनुसार अन्त्य इकार-उकार दीर्घ लिहिण्याचा नियम केला, तेव्हाही ‘रवि-रवी, गुरु-गुरू’ अशा काही अर्थभेदयुक्त शब्दांमधील लेखनभिन्नता संपलीच की. परंतु अशी भिन्नता संपल्यामुळे फार मोठे अर्थघोटाळे झाले, असे एकही उदाहरण माझ्या तरी ऐकिवात नाही. इथे आपण सर्वांनीच एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, ज्या शब्दांमध्ये इकार, उकार आणि अनुस्वार ह्या बाबी येतात, केवळ त्याच शब्दांना एकापेक्षा अधिक अर्थ आहेत, असे काही आहे का. ज्या शब्दांमध्ये मुळातच ह्या तीनपैकी एकही बाब नाही, अशा शब्दांनाही एकापेक्षा अनेक अर्थ आहेतच की. (उदाहरणार्थ: नवा= न वापरलेला; अननुभवी; अनोळखी; आधुनिक. पदर= साडीचा काठ; पापुद्रा; ताबा; आसरा; विषयाचे अंग; नहाण येणे. सोवळा= पवित्र; निर्व्यसनी; अलिप्त) मग असा अनेकार्थी शब्द एखाद्या ठिकाणी योजला जातो, तेव्हा अर्थाचा घोटाळा होतो का? नाही. कारण योग्य तो अर्थ संदर्भाने समजतो. इकार, उकार किंवा अनुस्वार नसलेले असे बहुसंख्य अनेकार्थी शब्द जर संदर्भाने बरोबर समजत असतील, तर ऱ्हस्व-दीर्घ-अनुस्वार-युक्त अशा थोड्या शब्दांचे अर्थभेद लेखनाने दाखवण्यासाठी नियमांमध्ये विनाकारण अपवाद आणण्याची नितांत आवश्‍यकता आहे का, हा विचार होणे मला महत्त्वाचे वाटते.

ह्या नव्या नियमांप्रमाणे लेखन बघणे हे सुरुवातीला विचित्र वाटेल ह्याची मला पूर्ण कल्पना आहे. किंबहुना मला स्वतःलाही काही दिवस ते विचित्रच वाटेल. त्याचप्रमाणे एवढ्या वर्षांची सवय सोडून एकदम असे लिहिणे हे, इतरांप्रमाणेच मलाही तेवढेच कठीण जाणार आहे. परंतु ‘नजरेला कसे दिसेल किंवा वाटेल, आणि आपली सवय बदलणे किती जड जाईल’ हे शास्त्रीय मुद्दे होऊ शकत नाहीत. त्याचप्रमाणे आपल्याला काय सोपे जाईल, असा विचार करणे, हा अप्पलपोटेपणा होईल. आपल्याला विचार करायचा आहे तो येणाऱ्या पिढीचा. ती पिढी कोणत्या प्रकारच्या वेगवान युगात वावरणार आहे, ह्याचा. अशा वेळी लेखनाच्या नियमांमध्ये एकवाक्यता असणारी भाषाच वेगात प्रगती करू शकेल, ह्या गोष्टीवर माझा तरी विश्वास आहे. आणि येणारी पिढी जेव्हा पहिल्यापासून ह्याचप्रमाणे लिहायला शिकेल, तेव्हा तिला ह्यात काहीच वावगे किंवा विचित्र वाटणार नाही, हे तर उघडच आहे. इंग्लिश भाषेतील स्पेलिंग्जमधील अनियमितपणा काढून टाकण्यासाठी किंवा होईल तेवढा कमी करण्यासाठी तिकडेही काही हालचाली सुरू झाल्याची कुणकुण आपल्याला महाजालावर दिसू लागली आहे. मग आपणही वेळीच सावध होणे शहाणपणाचे नाही का? किंबहुना त्यांच्या आधी आपण शहाणे झाले, तर ती बाब अधिक अभिमानाची असेल.

ह्याप्रमाणे नियम झाले, तर इकार-/उकारयुक्त कोणताही शब्द लिहावा लागेल, तेव्हा त्यातील इकार किंवा उकार कसा लिहायचा हे ठरवताना शब्दातील इकार-/उकारयुक्त अक्षर शब्दामध्ये अन्त्य, उपान्त्य किंवा उपान्त्यपूर्व ह्यांपैकी कोणत्या स्थानावर आहे; अनुस्वार, विसर्ग आणि जोडाक्षर ह्यांपैकी एखादी बाब त्यात आहे का; आणि तो साधित शब्द आहे की नाही; एवढेच बघणे पुरेसे ठरेल. त्यामुळे हे नियम पाळणे बहुसंख्यांना सहज सोपे तर जाईलच, पण तरीही त्यांत मराठीच्या लिखित प्रकृतीचे शास्त्र धरसोड न करता पाळलेले असेल.

प्रचलित नियमांचा माझा व्यवस्थित अभ्यास असून त्याच अभ्यासावर आज मी अनेक प्रकारची कामे करू शकत आहे. त्यामुळे प्रचलित नियमांचा मला व्यक्तिशः काही त्रास होत असल्यामुळे मी ते बदलून मागत नसून, सर्वसाधारण मराठी माणसाला लेखनात त्रासदायक ठरणारी अशी प्रचलित नियमांमधील विसंगती काढून टाकण्यासाठी आणि पुढच्या पिढीला काहीतरी शास्त्र पाळणारे लेखननियम देण्यासाठी हा सारा खटाटोप आहे, ही भूमिका लक्षात घेऊन ह्या नव्या नियमांकडे पाहावे, अशी माझी विनंती आहे.

नव्या सुलभ नियमांमुळे वितंडवाद झाला, तर रामबाण उपाय

नवे सुलभ नियम पाहिल्यावर वितंडवाद होण्याची शक्यता आहेच. त्यावर मी पुढील दोन उपाय सुचवू इच्छितो.

1)शासनाचे अधिकृत नियम म्हणून हे नवे सुलभ नियमच राहतील. ज्या व्यक्तींना हे नियम पाळणे मान्य नाही, त्यांना महामंडळाचे 18 नियम वापरण्याची मुभा द्यावी. मात्र मग त्यांनी ते नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत. ज्या व्यक्तीनां नवे सुलभ नियम मान्य आहेत, त्यांना ते नियम वापरण्याची मुभा द्यावी. मात्र मग त्यांनीही तेच नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत. कोणीही दोन्ही नियमांचे स्वैर मिश्रण करायचे नाही, असे सक्त बंधन असावे.

2)मात्र, 2015 किंवा 2016 ह्या वर्षांतील शैक्षणिक वर्षापासून शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात केवळ नव्या सुलभ नियमांचेच शिक्षण दिले जाईल. त्या विद्यार्थ्यांसाठी असलेली सर्व पाठ्यपुस्तके नव्या सुलभ नियमांनुसारच छापली जातील आणि त्यांच्यावर त्याप्रमाणेच लेखन करण्याचे बंधन असेल.

असे करण्याने कोणावरच कोणत्याच नियमांची जबरदस्ती होणार नाही. उलट कोणती गोष्ट पाळणे अधिक सोपे आहे ह्याचा कस लागेल आणि जे पाळणे कठीण आहे, ते कोणत्याही वादाशिवाय आपोआपच बंद होईल. शिवाय नवी पिढी सुरुवातीपासूनच नव्या सुलभ नियमांमध्ये वाढणार असल्याने तिला त्यात काहीच वावगे वाटणार नाही हे निश्चित. उलट मला तर खातरी आहे की, ही पिढी जेव्हा जुने लेखन बघेल, तेव्हा तिला आश्चर्य वाटेल की, एवढे सोपे नियम होऊ शकत असताना जुन्या पिढीने इतकी दशके ते किचकट आणि विसंगतीयुक्त नियम का आणि कसे पाळले?

नवे सुलभ नियम झाल्यानंतर काय करणे आवश्‍यक आहे?

शुद्धलेखनाचे नियम नुसते करून भागणार नाही. त्यांचा योग्य तो प्रसार ताबडतोब होणेही तेवढेच गरजेचे आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे हे की, होणारे सर्व नियम थोडे-थोडे करून इयत्ता नववीपर्यंत पूर्णपणे आणि तपशिलात शिकवले जातील असा अभ्यासक्रम असणे आवश्‍यक आहे. नवे नियम कसे आहेत आणि ह्या नियमांनुसार विविध शब्द आणि त्यांची विविध रूपे कशी लिहायची आहेत, हे दाखवणारे सविस्तर पुस्तक आणि एक सविस्तर कोश लगेचच उपलब्ध होणे हेही तेवढेच गरजेचे आहे. तरच आणि केवळ तरच भाषा ह्या विषयात गद्य, पद्य, व्याकरण (वाक्यरचनेसह) आणि शुद्धलेखन ह्या सर्व बाबींना शिकवण्यासाठी समान कालावधी आणि परीक्षेत समान गुणसंख्या असे महत्त्व देणारे शिक्षणधोरण असले पाहिजे. प्रश्नपत्रिकेत ह्या चारही विभागांना 25 गुणिले 4 अशी समान गुणसंख्या असली पाहिजे. तरच आणि केवळ तरच व्याकरण आणि शुद्धलेखन ह्या बाबींचे अध्ययन आणि अध्यापन गांभीर्याने आणि जबाबदारीने होईल. अन्यथा ह्या बाबी बाजूला टाकण्याच्या, दुर्लक्ष करण्याच्या आणि जमेल तेवढ्याच पाळण्याच्या राहतील. ‘केवळ धडे आणि कविता ह्यांखालची प्रश्नोत्तरे, तीही बहुधा मार्गदर्शकातून तोंडपाठ केलेली, जशीच्या तशी लिहिता आली, म्हणजे भाषा आली’, असे जे चित्र आज दिसत आहे, ते तसेच राहिले, तर मराठीवरचे भविष्यकालीन संकट कोणीही टाळू शकणार नाही. मराठीच काय, कोणत्याही अन्य भाषेतही जेव्हा-जेव्हा व्याकरण आणि शुद्धलेखन ह्या ‘भाषेची विविध अंगे’ दाखवणाऱ्या बाबींकडचे दुर्लक्ष वाढत जाईल, तेव्हा-तेव्हा ती भाषा संकटात येऊ लागेल हे निश्चित. मग भविष्यात संपूर्ण जगाची एकच मिश्र भाषा तयार झाली, तरीही भाषिक गोंधळ टाळायचे असतील, तर त्या भाषेलाही सुटसुटीत नियम असणे, ते नियम नीटपणाने शिकवले जाणे, आणि शिकवलेले नियम नीटपणाने पाळले जात आहेत का हे परीक्षेद्वारे तपासणे; ह्या त्रिसूत्रीची गरज कधीही संपणार नाही.

अरुण फडके

१ जानेवारी २००१


← Previous Post Next Post