मराठी शुद्धलेखनाबाबत मला पडलेले प्रश्न

व्याकरणाविषयी जागरूकता

लेखक अरुण फडके, दिनांक January 01, 2011 · 11 mins read

"मराठी शुद्धलेखनाबाबत मला पडलेले प्रश्न"

शुद्धलेखनाचे नियम करण्याचे काम महाराष्ट्र शासनाने ‘अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ’ ह्या संस्थेकडे सोपवले. ह्या संस्थेने 1962 साली प्रथम 14 नियम आणि नंतर 1972 साली आणखी चार नियम असे एकूण 18 नियम केले. ह्या सर्व नियमांना महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी मान्यता दिली आणि 1987 साली भाषा संचालनालयातर्फे ‘शुद्धलेखन नियमावली’ ह्या नावाने ह्या 18 नियमांची पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण ह्यांनी ह्या पुस्तिकेच्या सुरुवातीला ‘दोन शब्द’ लिहिले असून त्यांतील शेवटचा परिच्छेद असा आहे.

“इंग्रजीतून लिहिताना इंग्रजी शब्दांच्या “स्पेलिंग”विषयी व व्याकरणाविषयी आपण जेवढे जागरूक असतो तेवढेच मराठी लेखनाबाबतही असले पाहिजे. नियमांनुसार लेखन करणे हा भाषेची अस्मिता जपण्याचाच एक भाग असतो. मराठी आता या राज्याची अधिकृत भाषा झालेली असल्यामुळे या राजभाषेची प्रतिष्ठा सर्वच बाबतींत राखली जाईल हे पाहणे प्रत्येक मराठी भाषिकाचे कर्तव्य ठरते. प्रस्तुत पुस्तिका या दृष्टीने उपयोगी ठरेल असा विश्वास वाटतो.” शेवटी मुख्यमंत्र्यांची सही आहे.

मराठीतील सुमारे 22,000 शब्द निवडून महामंडळाच्या नियमांनुसार त्यांची होणारी विविध रूपे दाखवणारा ‘मराठी लेखन-कोश’ हा मराठीतला पहिला शुद्धलेखन कोश 2001 साली संपादित केल्यानंतर मी मराठी शुद्धलेखन ह्या विषयावर विविध अंगांनी आणखी तीन पुस्तके लिहिली आणि 2001पासून आजपर्यंत शुद्धलेखनाच्या प्रसारासाठी कार्यशाळा, अभ्यासवर्ग, प्रदर्शने असे विविध उपक्रम महाराष्ट्रात सुमारे 115 ठिकाणी केले आणि अजूनही करत आहे. ह्या सर्व खटाटोपात शुद्धलेखनाचे हे 18 नियम तपशिलात प्रत्यक्ष शिकवताना शिकवणाऱ्या व्यक्तीला येणाऱ्या अडचणी आणि शिकणाऱ्या व्यक्तींना येणाऱ्या अडचणी ह्यांचा अनुभव विविध अंगांनी घेतला. मनापासून चिंतन करून अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. आणि त्याच चिंतनातून ह्या विषयाबाबत मला पडलेले प्रश्न आज इथे मांडत आहे.

1)1962 सालापासून आजपर्यंत तब्बल 45 वर्षांचा कालावधी लोटला. तरीही, आजसुद्धा हे 18 नियम कोणत्याही पातळीवर तपशिलात शिकवण्याची सोय आपल्या शिक्षणपद्धतीत का नाही? ह्या 45 वर्षांत लक्षावधी शिक्षक तयार झाले आणि त्यांनी आजपर्यंत कोट्यवधी विद्यार्थ्यांना शिकवले. जी गोष्ट शिक्षकांनाच शिकवली गेलेली नाही ती ते विद्यार्थ्यांना शिकवू शकतील का? संपूर्ण मराठी घेऊन एम.ए. झालेल्या व्यक्तीलासुद्धा हे नियम माहीत नसतात, तरीही तिचे मराठी भाषेचे शिक्षण झाले, असे म्हणायचे का? नियम झाल्यावर लगेचच शिक्षणातून त्यांचा प्रसार योग्य रितीने झाला असता, तर शुद्धलेखनाबाबत आज उद्भवलेली परिस्थिती उद्भवली असती का? आजच्या परिस्थितीत, हे 18 नियम तपशिलात शिकवण्याची योजना करणे हा उपाय आहे, असे म्हणायचे की, उत्तरातील आशय योग्य असेल, तर शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष करणे हा उपाय आहे, असे म्हणायचे?

2)1972 सालीच 18 नियमांचे काम पूर्ण होऊनही शासनाची पुस्तिका प्रसिद्ध होण्यासाठी 1987 साल का उजाडले? एका नियमात किती पोटनियम आहेत आणि त्यातील नेमका नियम कोणता ह्या गोष्टी सामान्य माणसाला ह्या पुस्तिकेतून सहजरीत्या समजू शकतात का? शासनाने अशी पुस्तिका काढली आहे ह्याची माहिती महाराष्ट्रातील किती व्यक्तींना आहे, असे शासन म्हणू शकते? पूर्वी एक रुपया आणि सध्या तीन रुपये एवढी अत्यल्प किंमत असलेली ही पुस्तिका मुंबईतील चर्नी रोड येथील शासकीय मुद्रणालय वगळता महाराष्ट्रात कुठेकुठे सहज उपलब्ध आहे हे शासन सांगू शकते का? ह्या पुस्तिकेचा प्रसार वेळीच योग्य रितीने झाला असता, तर येणाऱ्या प्रतिक्रियांनुसार पुस्तिकेची मांडणी सहजसुलभ होऊन नियमांच्या प्रसाराला मदत झाली नसती का?

3)‘उच्चारानुसारी लेखन’ हे ह्या 18 नियमांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे, असे शासनाच्या पुस्तिकेत म्हटले आहे. ‘आपण मुखावाटे जेवढे ध्वनी काढू शकतो, त्या प्रत्येक ध्वनीसाठी एक स्वतंत्र लेखनचिन्ह आहे’, एवढी समृद्ध लिपी ज्या भाषेची आहे, त्याच भाषेत ‘उच्चारानुसारी लेखनाचे नियम’ ही गोष्ट शक्य आहे, असे म्हणता येईल का? आपल्या भाषेची लिपी एवढी समृद्ध नसेल, तर ‘उच्चारानुसारी लेखनाचे नियम’ करणे शक्य आणि योग्य होईल का? ‘कोणाचे आणि कोणते उच्चार प्रमाण मानायचे’ ह्या गोष्टीचा निर्णय करणे सहज शक्य आहे का? उच्चार आणि लेखन ह्यांचा एवढा घनिष्ठ संबंध ठेवायचाच असेल, तर प्रथम ‘उच्चारशास्त्र’ आणि ‘उच्चारकोश’ ह्या विषयांवर मराठीत सविस्तर ग्रंथ उपलब्ध आहेत का? तसे ते नसतील, तर अडचण आल्यावर मराठी माणसाने संदर्भ कुठे शोधायचा? महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या व्यक्तींचे वेगवेगळे उच्चार ध्वनिमुद्रित करून घेऊन त्यांच्या अभ्यासपूर्ण निरीक्षणाने काही निष्कर्ष काढण्याचे शास्त्रशुद्ध काम महाराष्ट्रात कधी झाले आहे का? आपल्या सर्व मुळाक्षरांचे योग्य उच्चार कसे करायचे, हे प्राथमिक शिक्षणही आपण कोणत्याही इयत्तेत धडपणाने देत नसू, तर ‘उच्चारानुसारी लेखनाचे नियम’ हे धोरण राबवणे योग्य आणि शक्य होईल का?

आता शासनाच्या नियमांवरून काही प्रश्न मांडतो

4)नियम क्र.1 काही शब्दांमधील अनुस्वारांचा उच्चार अस्पष्ट असतो. कधीकधी तो उच्चारलादेखील जात नाही. अशा शब्दांवर अनुस्वार देऊ नये. नियम क्र.3 नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरूपांवर विभक्तिप्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा. आदरार्थी बहुवचनाच्या वेळीही असा अनुस्वार दिला पाहिजे.

प्रश्न नियम क्र.3नुसार आम्हां, आम्हांला, तुम्हां, तुम्हांला, आपणांस हे शब्द अनुस्वारयुक्त लिहिले पाहिजेत, परंतु ह्यांतील अनुस्वार नियम क्र.1प्रमाणे अस्पष्टोच्चारित किंवा अनुच्चारित आहे. मग हे शब्द अनुस्वारयुक्त लिहायचे की अनुस्वारविरहित लिहायचे? आमच्याहून, आमचा, आमच्यात; तुमच्याहून, तुमचा, तुमच्यात; आपल्याशी, आपल्याला, आपल्याहून, आपल्यात; ह्या सर्वनामांमधील सामान्यरूपे अनेकवचनी किंवा आदरार्थी बहुवचनी अशीच आहेत. मग हे शब्द अनुस्वारविरहित का लिहिले जातात? सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरूपांवरील आणि आदरार्थी बहुवचनी सामान्यरूपांवरील अनुस्वारही स्पष्टोच्चारित असेल तरच द्यावा, असा नियम करणे अधिक योग्य होईल का?

5)नियम क्र.5 मराठीतील तत्सम इकारान्त आणि उकारान्त शब्द दीर्घान्त लिहावे. उदा. बुद्धी, अणू. सामासिक शब्द लिहिताना समासाचे पूर्वपद तत्सम ऱ्हस्वान्त शब्द असेल तर ते पूर्वपद ऱ्हस्वान्तच लिहावयाचे आहे. उदा. बुद्धिवैभव, अणुशक्ती. साधित शब्दांनाही हाच नियम लावावा. उदा. शक्तिमान, इंदुमती. ह्या नियमाच्या स्पष्टीकरणात असे म्हटले आहे की, या शब्दांमध्ये पूर्वपद असलेले संस्कृत शब्द मराठी भाषेने आत्मसात केल्यामुळे ते मराठीच्या प्रकृतीनुसार एरव्ही दीर्घान्त लिहावयाचे असले, तरी समासामध्ये ते मूळ स्वरूपात योजलेले असल्यामुळे ते ऱ्हस्वान्तच लिहावे. संस्कृतमधील ‘इनन्त’ शब्दांबाबतही असाच नियम आहे.

प्रश्न संस्कृतातून मराठीत घेतलेले ऱ्हस्वान्त शब्द मराठीत सुटे लिहिताना मराठीच्या प्रकृतीनुसार दीर्घान्त लिहायचे असतील, तर ते समासात प्रथमपदी लिहितानाही मराठीच्या प्रकृतीनुसार दीर्घान्तच का लिहायचे नाहीत? खडीसाखर, वांगीपोहे (तत्पुरुष); दहीभात, भाऊबहीण (द्वंद्व); मातीमोल, वाळूवजा (बहुव्रीही); असे मराठीतील सामासिक शब्द पाहिल्यावर समासातील प्रथमपदासाठीही मराठीची प्रकृती दीर्घान्तच दिसत नाही का? ‘उच्चारानुसारी’, असे म्हटले तरी, मराठीतील सामासिक शब्द उच्चारताना पहिले पद दीर्घान्त, आणि संस्कृतमधील सामासिक शब्द उच्चारताना (तो संस्कृतमधील आहे हे माहीत नसूनसुद्धा) पहिले पद ऱ्हस्वान्त, असा उच्चार मराठी माणसाकडून आपोआपच होत असतो, हे सिद्ध करता येईल का? संस्कृतमध्ये काही शब्द ‘इनन्त’ असे असतात, ही मूलभूत गोष्ट किती मराठी माणसांना माहीत असते? तशी ती माहीत असेल, तर ‘मंत्रीपद, मंत्रीपदी, मंत्रीवर्ग’ हे शब्द वर्तमानपत्रांमधून वर्षानुवर्षे असे चुकीचे का छापले जातात?

6)नियम क्र.6 मराठी शब्दातील शेवटच्या अक्षरातील स्वर दीर्घ असेल, तर त्याच्या उपान्त्य अक्षराचा इकार किंवा उकार ऱ्हस्व असतो. उदा. खिळा, सुळा; माहिती, सुरी; पिसू, सुरू; पाहिजे, कुठे; निघो, फुटो. मात्र तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही. उदा. प्रतीक्षा, पूजा; कस्तूरी. नियम क्र.7 अ-कारान्त मराठी शब्दातील उपान्त्य इकार व उकार दीर्घ लिहावे. उदा. खीर, खूण. मात्र तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही. उदा. विष, गुण. मराठी शब्दांतील अनुस्वार, विसर्ग किंवा जोडाक्षर यांच्या पूर्वीचे इकार व उकार ऱ्हस्व असतात. उदा. भिंग, सुंठ; छिः, थुः; विस्तव, मुक्काम. मात्र तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही. उदा. तीक्ष्ण, पूज्य. नियम क्र.8 उपान्त्य दीर्घ ई-ऊ असलेल्या शब्दांचा उपान्त्य ईकार-ऊकार उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी ऱ्हस्व लिहावा. उदा. गरीब-गरिबाला, सून-सुनेला. मात्र तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही. उदा. शरीर-शरीरात, सूत्र-सूत्रात.

प्रश्न नियम क्र.5, 6, 7 आणि 8 ह्यांमध्ये मराठी आणि संस्कृत शब्दांच्या लेखनासाठी असलेला फरक पाहिल्यावर पुढील प्रश्न पडतात शालेय शिक्षणातून संस्कृत हा विषय सोडून द्यायला परवानगी दिल्यानंतर ‘विशिष्ट शब्द संस्कृतमधून घेतलेला आहे, हे ओळखायचे कसे’ ह्या विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या प्रश्नाला उत्तर आहे का? शेवटच्या अक्षरातील स्वर दीर्घ असेल, तर उपान्त्य अक्षराचा इकार किंवा उकार ऱ्हस्व असतो; अ-कारान्तापूर्वीचा इकार किंवा उकार दीर्घ असतो; अनुस्वार, विसर्ग व जोडाक्षर ह्यांच्यापूर्वीचे इकार किंवा उकार ऱ्हस्व असतात; आणि मराठी नामांची उभयवचनी सामान्यरूपे होताना उपान्त्य अक्षराचा दीर्घ इकार किंवा दीर्घ उकार ऱ्हस्व होतो; ही मराठीची प्रकृतीच नाही का? ऱ्हस्व-दीर्घाच्या पहिल्याच नियमात मराठीची प्रकृती मान्य केल्यानंतर ऱ्हस्व-दीर्घाचे पुढील नियमही मराठीच्या प्रकृतीनुसारच का केले गेले नाहीत? मराठीच्या नियमानुसार न लिहिला जाणारा संस्कृत शब्द उच्चारताना (तो संस्कृत आहे हे माहीत नसूनसुद्धा) मराठी माणसाकडून त्या शब्दाच्या उच्चारात आपोआप योग्य तो फरक होतो हे सिद्ध करता येईल का? ‘विष’ आणि ‘गुण’ ह्यांसारख्या संस्कृत शब्दांचे उच्चार मराठी माणूस ‘खीर’ आणि ‘खूण’ ह्यांसारख्या मराठी शब्दांप्रमाणेच करतो, हे स्पष्टपणे दिसत नाही का? कोणत्याही भाषेतून एखादा शब्द मराठीत घेतल्यानंतर तो सर्व ठिकाणी मराठीच्या नियमानुसार आणि प्रकृतीनुसार लिहावा, असा नियम करणे अधिक योग्य होईल का?

7)मराठीच्या पाठ्यपुस्तकात धड्याखालील स्वाध्यायात ‘हे शब्द असेच लिहा’ अशा मथळ्याखाली काही शब्द दाखवलेले असतात. वास्तविक पाहता ह्या शब्दांमधून शुद्धलेखनाचा नियमच सांगायचा असतो. मग तो थेट आणि व्यवस्थित न सांगता असा आडवळणाने सांगण्याचे कारण काय? ह्या मथळ्याखालील शब्दांचा उपयोग करून वर्गात कधी शुद्धलेखन शिकवले जाते का? नववी आणि दहावी ह्या इयत्तांच्या मराठीच्या पुस्तकांच्या शेवटी शुद्धलेखनाचे 18 नियम छापलेले आहेत. असे ते नुसते छापले म्हणजे शिकवले गेले, असे समजायचे का? हे नियम केवळ अतिरिक्त माहिती म्हणून छापलेले आहेत, का तो अभ्यासक्रमाचा भाग आहे ह्याबद्दल कुठे स्पष्ट सूचना आहेत का? धडे आणि कविता ह्यांखालील प्रश्नोत्तरे, तीही बहुधा मार्गदर्शकातून तोंडपाठ केलेली, देता आली म्हणजे भाषाशिक्षण झाले असे म्हणता येईल का? गद्य, पद्य, व्याकरण आणि शुद्धलेखन ह्या सर्व बाबींना प्रश्नपत्रिकेत जोपर्यंत समान गुणसंख्या मिळत नाही, तोपर्यंत व्याकरण आणि शुद्धलेखन ह्या बाबींचे अध्यापन आणि अध्ययन दुर्लक्षितच राहील, हे सत्य नाही का? इयत्ता तिसरी ते इयत्ता नववी ह्या सात शालेय वर्षांमध्ये वर्षाकाठी केवळ आठ घड्याळी तास एवढा वेळ शुद्धलेखनाला मिळाला, तर हा विषय कोणत्याही ताणाशिवाय सहज शिकवता येईल, अशी योजना मी स्वतः किंवा आम्ही काही मंडळींनी तयार करून दिली, तर ती राबवण्याचे धोरण शिक्षण मंडळ स्वीकारेल का?

8)‘शास्त्रापेक्षा रूढी श्रेष्ठ’ ही उक्ती खरंच योग्य आहे का? ही उक्ती प्रमाण मानून मानव जगला असता, तर आदिमानव अवस्थेपासून आजच्या मानवापर्यंत मानवाने जी प्रगती केली, ती शक्य झाली असती का? शरीरशास्त्राचे महत्त्व पटले म्हणूनच बालविवाहाची रूढी बंद करण्यात आली, हे सत्य नाही का? ‘अज्ञान, अंधानुकरण आणि अनास्था’ ही जर रूढी पडण्यामागची कारणे असतील, तर ती रूढी योग्य मानायची का? ‘मान-अपमान, उपकार, वाद नको म्हणून तडजोड’ अशा बाबींचा अंतर्भाव असलेल्या एखाद्या विचारप्रणालीला शास्त्र म्हणता येईल का?

‘रूढी’ ह्याविषयी मराठी विश्वकोशात पुढीलप्रमाणे उल्लेख आढळतो ‘सर्वसाधारण समाजाच्या दृष्टीने रूढी हे समाज-नियंत्रणाचे उत्कृष्ट साधन होय.’ ‘आहेत त्या रूढी टिकवून समाजपरिवर्तन घडवून आणता येत नाही.’

‘आधुनिक मराठी गद्याचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे विष्णुशास्त्री चिपळूणकर ह्यांनी त्यांच्या ‘निबंधमाला’ ह्या मासिकातील ‘लेखनशुद्धी’ ह्या लेखात शास्त्र आणि रूढी ह्यांविषयी पुढीलप्रमाणे म्हटले आहे ‘शास्त्र म्हणजे तत्त्ववेत्त्या पुरुषांनी चांगला विचार करून घालून दिलेले नियम; आणि रूढी म्हणजे कालगत्या पडलेला प्रचार.’

शेवटी माझे घोषवाक्य उद्धृत करून ही प्रश्नमंजूषा आत्तापुरती थांबवतो ‘शुद्धलेखन हा आग्रह न राहता ती सवय झाली पाहिजे.’

अरुण फडके

१ जानेवारी २००१


← Previous Post Next Post